
नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृह परिसरात गुरुवारी सायंकाळी थरारक घटना घडली. पोलिसांच्या ताब्यातून दोन न्यायप्रविष्ट कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत पाठलागादरम्यान एका पोलिस कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली.
पोलिस नाईक रामराव पवार (वय ५४) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, साहिल धीरज लांजेवार (वय १९) आणि ऋषिकेश उर्फ रुशी गणेश मांकर (वय २१) या दोन आरोपींना जेलमध्ये दाखल करण्यासाठी पोलिस वाहनातून नेत असताना त्यांनी अचानक वाहनातून उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी दोघांचा पाठलाग केला. हा पाठलाग कारागृहातील उपमहानिरीक्षक (DIG) कारागृह कार्यालयाच्या मागील भागापर्यंत गेला. याठिकाणी झटापट झाली. या झटापटीदरम्यान आरोपी साहिल याने लाकडी काठीने पोलिस कॉन्स्टेबल सूर्यप्रकाश वावरे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. वावरे यांच्या डोक्यावर, उजव्या गुडघ्यावर, कोपरावर आणि तळहातावर मारहाण करण्यात आली.
जखमी कॉन्स्टेबल वावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
पोलिसांनी घटनास्थळावरून तुटलेली लाकडी काठी, निळ्या रंगाची बॉलपॉईंट पेन,कॉन्स्टेबल वावरे यांची नेमप्लेट जप्त केली आहे.
दोन्ही आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानंतर त्यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १३२, १२१(१), २६२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंतोली पोलीस पुढील तपास करत आहेत.








