
नागपूर: ‘अॅडव्हान्टेज विदर्भ – खासदार औद्योगिक महोत्सवा’त आज एकूण चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यापैकी राज्य सरकार आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात झालेला सामंजस्य करार विशेष महत्त्वाचा ठरला असून, या कराराअंतर्गत नागपुरात तब्बल १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
ही गुंतवणूक पुढील दहा वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, २०२८ पासून प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांतर्गत नागपुरात एक एकात्मिक (इंटिग्रेटेड) ऑटोमोबाईल प्रकल्प उभारला जाणार असून, त्यामध्ये ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहन तसेच ट्रॅक्टर उत्पादन विभागांचा समावेश असेल.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी नागपुरात सुमारे १,५०० एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच संभाजीनगर येथे १५० एकर क्षेत्रावर सप्लायर पार्क उभारण्यात येणार असून, पुढील टप्प्यात इगतपुरी येथे सुमारे ३०० एकर क्षेत्रावर त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र हे उद्योगांसाठी पोषक वातावरण असलेले राज्य असल्याचे नमूद करत, राज्य सरकार तसेच स्थानिक नागरिक अत्यंत उद्योगस्नेही आणि विकासाभिमुख असल्याचे मत महिंद्रा अँड महिंद्राचे वरिष्ठ अधिकारी राजेश जेजुरीकर यांनी व्यक्त केले. या संपूर्ण प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांनी असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य वित्तीय सल्लागार कौस्तुभ धावसे, राज्याचे उद्योग सचिव पी. अन्बलगन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही आभार मानण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक करत, विदर्भात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.








