मनपा-ग्रीन व्हिजीलतर्फे जनजागृती : महाल परिसरात पौर्णिमा दिवसाचे आयोजन
नागपूर : गरज नसताना सर्वच्या सर्व विद्युत दिवे सुरू ठेवू नका. अनावश्यक दिवे बंद करा आणि वीज बचतीत मोलाचे सहकार्य करा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी केले.
पौर्णिमा दिवसाचे औचित्य साधून बुधवारी (ता. १७) महाल परिसरातील शिवाजी पुतळा, गांधी गेट येथे जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालिन महापौर अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात काही वर्षांपूर्वी पौर्णिमा दिवसानिमित्त वीज बचतीचे अभियान सुरू करण्यात आले होते. नागपुरात प्रत्येक पौर्णिमेला आयोजित या उपक्रमामुळे बरीच जनजागृती झाली असून नागरिक आता वीज बचतीबाबत जागरुक झाले आहे.
प्रत्येक पौर्णिमेला नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक या अभियानात सहभागी होतात. महापौर नंदा जिचकार आणि प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात महाल परिसरात आयोजित या अभियानात मनपाचे दिलीप वंजारी, बंडू अपराजित सहभागी झाले होते.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल, स्वयंसेवक मेहुल कोसुरकर, बिष्णूदेव यादव, शीतल चौधरी, प्रिया यादव, दादाराव मोहोड यांनी व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये जाऊन वीज बचतीचे महत्त्व सांगितले. अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी अनावश्यक वीज दिवे एक तासाकरिता बंद करीत अभियानात सहभाग नोंदविला. प्रत्येक पौर्णिमेलाच नव्हे तर अनावश्यक वीज दिवे बंद ठेवणे ही सवय बनविण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला. या उपक्रमाचे महाल परिसरात चांगलेच कौतुक झाले.