शिक्षण सभापतींनी घेतला मुख्याध्यापकांचा वर्ग : जाणून घेतली माहिती आणि अडीअडचणी
नागपूर : संपूर्ण शिक्षण विभागाची कार्यप्रणाली, शाळांची सद्यस्थिती, विद्यार्थी-पालकांची भूमिका आणि शिक्षकांचे प्रयत्न जाणून घेण्यासाठी शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी ३ ते १९ जुलैदरम्यान दहाही झोनअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील मुख्याध्यापकांचा वर्ग घेतला. मुख्याध्यापकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चालू शैक्षणिक सत्रात मनपाच्या शिक्षण विभागाचा चेहरामोहरा बदलविण्याचा संकल्पच या माध्यमातून सभापतींनी केला.
मनपाच्या सर्व शाळांची माहिती शिक्षण विभागाला माहिती व्हावी आणि गरजेनुसार संबंधित शाळांमध्ये, शिक्षकांमध्ये बदल करण्यात यावे, या हेतूने मुख्याध्यापकांच्या बैठकांचे आयोजन करण्याचे निर्देश शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने झोननिहाय मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यात आल्या. यामध्ये सभापतींनी मुख्याध्यापकांकडून काही मुद्यांच्या आधारावर माहिती जाणून घेतली. ‘असर’ सर्वेक्षण अहवालाअंतर्गत शाळेचा शैक्षणिक दर्जा, शाळांमधील भौतिक असुविधा, मागील वर्षीची आणि चालू शैक्षणिक सत्रातील पटसंख्या आणि शिक्षकांची संख्या आदींबाबत सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी प्रत्यक्ष मुख्याध्यापकांकडून माहिती जाणून घेतली. या माहितीच्या आधारे चालू शैक्षणिक सत्रात मुख्याध्यापकांनी शाळांत कोणकोणते बदल करायचे, याबाबत सभापतींनी सूचना केल्या. याच आधारावर आता पुढील सत्रातील शैक्षणिक वाटचाल ठरणार आहे.
समारोपीय बैठक लकडगंज झोनअंतर्गत येणाऱ्या रामपेठ येथील डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. बैठकीला सर्व शाळांचे मुख्याध्यापक हजर होते.
यावेळी शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहू, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, नगरसेवक मनोज चापले, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, श्री. बिसेन उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, नागपूर महानगरपालिकांच्या शाळांमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नाव गाजवित आहे. मनपाच्या शाळांमध्ये पूर्वीसारखी विद्यार्थ्यांची पटसंख्या असावी यासाठी संपूर्ण शिक्षण विभागाने एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी मेहनत घेतली तर हे अशक्य नाही, असे म्हणत शिक्षकांनीही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे असे आवाहन त्यांनी केले. दहाही झोनमध्ये झालेल्या बैठकीचा सारांश सांगत मुख्याध्यापकांनी मनावर घेतले तर आश्चर्यकारकरीत्या शिक्षण विभागात बदल घडून येऊ शकतो, असे म्हणत शाळांमध्ये असलेल्या भौतिक असुविधा तातडीने दूर करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी दिला. वीज, पाणी आणि स्वच्छतेच्या संदर्भात मुख्याध्यापकांनी स्वत: झोन सभापती आणि सहायक आयुक्तांशी संपर्क साधून त्या समस्या सोडवून घ्यावा, असे निर्देश दिले.
शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी प्रास्ताविकातून मुख्याध्यापक बैठक आयोजनासंदर्भात भूमिका विषद केली. समारोपीय बैठकीला लकडगंज झोनअंतर्गत येणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.