Published On : Fri, Aug 28th, 2020

तुकाराम मुंढेंचे आरोप गढूळ आणि गलिच्छ मानसिकतेचे प्रदर्शन

विधी समिती सभापती तथा भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा आरोप

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे सीईओ म्हणून झालेले पदपतन आणि आता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी भारतीय जनता पार्टीवर
“माझ्याकडे पाठविलेल्या महिलांचा कपडे फाडण्याचा प्रयत्न” असा अतिशय गंभीर आरोप केलेला आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने अशाप्रकारचे राजकीय आरोप करणे हे श्री. मुंढेंच्या गढूळ आणि गलिच्छ मानसिकतेचे प्रदर्शन असल्याचे भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकाद्वारे मत व्यक्त केले आहे.

मनपा आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपा तर्फे पाठविण्यात आलेल्या महिलांनी कपडे फाडल्याचा अतिशय गंभीर आरोप केला आहे. यावर बोलताना ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, जर असे होते तेव्हा का चकार शब्द देखील तुकाराम मुंढे यांनी काढला नाही? स्मार्ट सिटीच्या स्तनदा महिला अधिकाऱ्याची केलेली मानसिक प्रताडना, विविध पदांवरील महिला अधिकाऱ्यांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्या पुरूषी व अहंकारी मानसिकतेचे गलिच्छ प्रदर्शन नव्हे काय? असा सवाल ही त्यांनी विचारला आहे.

सात महिन्याच्या कार्यकाळातील कामाचा मागितला हिशेब
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सात महिने काम करताना नेमके काोणते रचनात्मक काम केले? असा सवाल करत पावसाळ्यात पाण्याचे टँकर कमी करणाऱ्या मुंढे यांनी टँकर कमी करून फेऱ्या किती वाढवल्या? शहरात किती आणि कोणत्या सुधारणा करण्यात आल्या त्याचे आकडे मुंढे यांनी सादर करावे, असे आवाहनही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.

नाग नदीचा कायाकल्प केल्याचा खोटारडा दावाही करण्यात आला. तत्कालिन मनपा आयुक्तांनी कार्यादेश निर्गमित केलेल्या कामांना अधिकार नसतांना स्थगिती दिली. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ८६ चा दाखला देऊन सभागृहाची दिशाभूल केली. ‘नागपूर लाइव्ह सिटी ॲप’ संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नाला फिरवाफिरवीचे उत्तर दिले, या ॲपद्वारे किती तक्रारी दाखल झाल्या, त्यापैकी किती सोडविल्या व किती शिल्लक आहेत आणि त्यामागची कारणे काय, या प्रश्नाच्या उत्तरात फक्त आकडे सादर करण्यात आले. मात्र समस्या न सोडविण्याच्या मागच्या कारणांचा उल्लेख करण्यात आला नाही. समस्या सोडविली न गेल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा दावा करण्यात आला. अशा किती अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली व कारवाईचे स्वरूप काय असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नावरही संभ्रमित करणारे उत्तर देण्यात आले. निर्धारित कालावधीत समस्या सोडविली न गेल्यास ती तक्रार आपोआप संबंधित विभागप्रमुखाकडे वर्ग होत असून संबंधिताला कारणे दाखवा नोटीस जात असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले.

एकूणच स्वतःवरील आरोप आणि प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी महिलांसंदर्भातील असे गंभीर वत्तव्य करणे ह्यामागे त्यांचा नेमका हेतू काय? व नेमक्या कोणत्या गोष्टीच्या प्रभावात त्यांनी हे वक्तव्य केले? ह्याचा देखील शोध घेणे आवश्यक असल्याचे ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.