Published On : Fri, Aug 28th, 2020

शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍याला 50 हजार रुपये नुकसानभरपाई त्वरित द्यावी

Advertisement

बावनकुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटले जिल्हाधिकार्‍यांना

नागपूर: नागपूर-विदर्भात सततच्या होत असलेल्या पावसामुळे सोयीबीन आलेल्या मोझॅक नावाच्या खोड किड्याच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य शासनाने सोयीबीन उत्पादक शेतकर्‍याला 50 हजार रुपये प्रति एकरी याप्रमाणे त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा नागपूर-विदर्भातर्फे करण्यात आली असून भाजपाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज एक शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटले व मागणीचे निवेदन सादर केले.

कोरोनामुळे आधीच संपूर्ण समाज हवालदिल झाला असताना शेतकरीही आर्थिक संकटात सापडला. त्यात आता सतत होणार्‍या पावसाने व रोगराईमुळे सोयाबीनसारखे हातात येत असलेले पिकही शेतकर्‍याच्या हातून निसटले आहे. विदर्भ नागपुरात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असून मोझॅक नावाच्या खोडकिड्याने शेतकर्‍याच्या हातातून हे पीक हिसकले आहे. या पिकावर एकाचवेळी खोडमाशी, चक्री भुंगा, मुळकुंज, कॉलर रॉट यासारख्या किडीचा प्रादुर्भाव आढळला आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे हजारो हेक्टरवरील पीक हातून गेल्यासारखे आहे.

पावसाने साथ दिल्यामुळे शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरले व दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. सोयाबीनला शेंगा दिसू लागल्या आणि रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला. रोगाचा फैलाव एवढा आहे की, सोयाबीनचे पीक हातातून गेल्यासारगे आहे. सततचा पाऊस आणि तीन आठवड्यापासून असलेले ढगाळ वातावरण यामुळे रोगाचा प्रादुर्भाव जोराने झाला. त्यामुळे शेतकर्‍याला कोणतीही उपाययोजना करता आली नाही.

सोयाबीनच्या शेंगा गळून खाली पडत आहेत. अनेक शेतकर्‍यांना तर जनावरे सोयीबीनच्या पिकात चरायला सोडावी लागली. शेतकर्‍याचा सोयाबीन पेरणीचा खर्चही निघणार नाही अशी स्थिती झाली आहे. अशा स्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले आहे.

शेतकर्‍याच्या पिकाची ही अवस्था लक्षात घेता राज्य शासनाने त्वरित एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई सोयाबीन उत्पादक शेतकर्‍याला द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली असून, जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, महामंत्री अजय बोढारे, आनंदराव राऊत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.