Published On : Thu, Mar 12th, 2020

नागपुरात पाणीपुरवठ्यात लक्षणीय सुधार मनपा आयुक्तांची २४ x ७ कडे वाटचाल

नागपूर: नागपूर शहरात अनेक भागांमध्ये होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत आता दिलासा मिळत आहे. शहरातील अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये लक्षणीय सुधार झाल्याचे दिसून येत आहे. दररोज दीड ते दोन तास पाणी पुरवठा होत असलेल्या लक्ष्मीनगर, हनुमाननगर, सतरंजीपुरा, आसीनगर, मंगळवारी व नेहरुनगर या झोनमध्ये आता तब्बल १८ तास पाणी पुरवठा होणार आहे. शहरातील पाणी पुरवठ्याच्या वेळेबाबत आलेल्या तक्रारींवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. संपूर्ण शहरात २४ x ७ पॅटर्न यशस्वी करण्याकडे त्यांनी वाटचाल सुरू केली आहे.

उन्हाळ्यापूर्वी पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये वाढ करण्यात आल्याने नागरिकांतर्फेही आनंद व्यक्त केला जात आहे. मनपाच्या या निर्णयामुळे टाकळी सिम, नालंदा नगर, श्रीनगर, ओमकार नगर, वंजारी नगर (न्यू), बस्तरवाडी, बोरियापुरा, बेझनबाग, राजनगर, सक्करदरा, कमांड एरिया येथील रहिवासी नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

Advertisement

श्रीनगर, नालंदानगर येथे यापूर्वी दीड तास तर बस्तरवाडीमध्ये दोन तास पाणीपुरवठा केला जात होता. येथील रहिवास्यांना आता दररोज ८ ते १० तास पाणीपुरवठा केला जात आहे.

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारी २०२० ला पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांचे आरोग्य, पाणीपुरवठा अशा महत्वपूर्ण कामांना प्राथमिकता दिली. आयुक्तांनी भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये वैज्ञानिक पद्धतीने कच-यावर प्रक्रिया करण्याच्या कार्याला गती देत पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारण्याबाबत महत्वपूर्ण पाउल उचलले. आयुक्तांनी हुडकेश्वर नरसाळा येथील १२० पाणी टँकर बंद केले. त्यानंतर ६ झोनच्या १२ कमांड एरियामध्ये पाणीपुरवठ्यामध्ये वाढ केली आहे.

मनपातर्फे २४ तास पाणीपुरवठा करण्याबाबत प्रयत्न सुरू असून दुसरीकडे अवैध नळ कनेक्शन व लिकेजेस बंद करण्याच्या दिशेनेही युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जलप्रदाय विभागाद्वारे १०६ घरांमधून डबल वाटर कनेक्शन कापण्यात आले आहेत. सोबतच २६० घरांमध्ये अवैध कनेक्शनवर कारवाई करण्यात आली असून १७० घरातील पाणी मीटरमधील गडबडी पकडण्यात आली. यामुळे मनपाच्या १ दलघमी पाण्याची बचत झाली. ही संपूर्ण कारवाई बिनाकी, इंदोरा, सक्करदरा, सीताबर्डी किल्ला, महाल किल्ला, बस्तरवाडी, राज नगर, जीएच सदर आणि श्रीनगर या कमांड एरियात करण्यात आली. बेझनबाग नासुप्र वसाहतीतील अवैध कनेक्शन्स कापल्यामुळे बेझनबाग कमांड एरियात पाणीपुरवठ्याच्या वेळेत वाढ होण्यास मदत झाली.

पाणी गळतीसंदर्भातही जलप्रदाय विभागाने ठोस पावले उचलली. बर्डी कमांड एरियामधील राजभवन येथे पाणी गळती थांबविण्यात आली. टेकडी रोड व मानस चौकातील अवैध पाईप लाईन कापण्यात आल्याने सुमारे २ दलघमी पाण्याची बचत करण्यात आली. यामुळे आता सुमारे ३ दलघमी पाण्याची बचत होऊ लागली आहे.

मनपातर्फे पाणी बिल न भरणा-यांवरही मोठी कारवाई करण्यात आली. जलप्रदाय विभागाने बिल न भरणा-या १६४० ग्राहकांचे नळ कनेक्शन कापले. या कारवाईचा धसका घेत ५१७९ ग्राहकांनी तात्काळ २.६ कोटी पाणी बिल जमा केले. मागील वर्षी फेब्रुवारी २०१९मध्ये अरिअर्ससह वसुली १०५ टक्के होती. यावर्षी अर्थात फेब्रुवारी २०२० मध्ये थकीत बिलांसह १०९ टक्के वसुली झाली आहे. अवैध कनेक्शन कापण्याच्या मोहिमेमुळे जलप्रदाय विभागाला हे यश आले आहे.

जलप्रदाय विभागाकडे येणाऱ्या तक्रारींमध्येही नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात घट झाली आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या दरम्यान महिन्याकाठी येणाऱ्या तक्रारींचा आकडा सरासरी ३४४४ इतका होता. तो कमी होऊन फेब्रुवारी महिन्यात ३२५० इतका झाला आहे.

जलप्रदाय विभागातर्फे वाटर ऑडिटही सुरू करण्यात आले आहे. हे ऑडिट मार्च २०२० अखेर पूर्ण होईल. साधे पाणी तसेच जलशुद्धीकरण केंद्रातून करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये केवळ १ ते २ टक्के लिकेज असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement