Published On : Thu, Mar 12th, 2020

परिस्थितीचे गांभीर्य जपून सुरक्षितरित्या कर्तव्य बजावा!

Advertisement

आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा : ‘कोरोना’संदर्भात मनपाची आरोग्य सुविधा ‘अलर्ट’

नागपूर : शहरात ‘कोरोना’ व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. रुग्णावर सुरक्षितरित्या उपचार सुरू आहे. मात्र शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णालयात येणा-या प्रत्येक रुग्णाची संपूर्ण माहिती विचारणे, त्यावर तातडीने आवश्यक उपचार करणे, मात्र उपचार करताना मास्कचा वापर, हात धुण्यासाठी हँडवॉश, सॅनिटायजरचा वापर करणे, नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती पसरू नये यासाठी योग्य प्रकारे जनजागृती करणे गरजेचे आहे. एकूणच परिस्थितीचे गांभीर्य जपून स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसह कर्तव्य बजावा, असे निर्देश मनपा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

‘कोरोना’संदर्भात गुरूवारी (ता.१२) आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी मनपाच्या सर्व वैद्यकीय अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी डॉ.सरीता कामदार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, डॉ.नरेंद्र बहिरवार, टाटा ट्रस्टचे डॉ.टिकेश बिसेन यांच्यासह मनपाच्या दहाही झोनचे झोनल अधिकारी, विविध प्राथमिक आरोग्य केंद्र तथा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

‘कोरोना’चा प्रसार रोकण्यासाठी सर्व यंत्रणा ‘अलर्ट’ आहे. मनपातर्फे नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहे. याशिवाय मनपाच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तथा रुग्णालयांमध्ये नियमीत स्वच्छता ठेवण्यात यावी. तसेच २४ तास वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित राहावे.

रुग्णालयामध्ये येणा-या सर्वसामान्य नागरिकांमधील भिती घालविणे हे महत्वाचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर जनजागृती करणे आवश्यक आहे. जनजागृतीसाठी शहरात विविध ठिकाणी बॅनर, पोस्टर्स लावण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. ते योग्यरित्या लावण्यात आल्याची खात्री करण्यात यावी, असेही आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी निर्देशित केले.

झोनल अधिका-यांनीही झोन स्तरावर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. झोपडपट्टी भागांमध्ये जनजागृतीवर जास्तीत जास्त भर देण्यात यावे. याशिवाय सर्व वैद्यकीय अधिका-यांनी आपापल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रुग्णालयातील रुग्णांची दैनंदिन माहिती तातडीने विभागप्रमुखांना सादर करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

मनपातर्फे विशेष नियंत्रण कक्ष
बैठकीत प्रारंभी आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे यांनी सर्व वैद्यकीय अधिका-यांना परिस्थिती हाताळण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविता यावे यासाठी मनपामध्ये विशेष नियंत्रण कक्ष उघडण्यात करण्यात आले आहे. शिवाय ०७१२-२५६७०२१ हा आपात्कालीन क्रमांकही उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयामध्ये २४ तास वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व कर्मचा-यांनी उपस्थित राहावे. रुग्णांच्या उपचारासह स्वत:ही सुरक्षेची काळजी घ्यावी. वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे आणि पूर्णवेळ मास्क बांधून राहण्याचेही त्यांनी निर्देशित केले.

कोरोना संदर्भात महापौरांचे आवाहन
नागपूर शहरामध्ये कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, रुग्णावर उपचार सुरू आहे. करोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, वेळोवेळी हात धुवा, गर्दीत जाणे टाळा, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी असे लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेष म्हणजे, सोशल मीडियावर फिरणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका.