Published On : Thu, Mar 12th, 2020

नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी- डॉ. संजीव कुमार

Advertisement

जिल्हा प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सज्ज सात देशातून आलेल्या प्रवाशांचे क्वॉरंटाईन करण्यात येणार नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये

नागपूर: कोरोना विषाणूसंदर्भात संशयित नागरिकांची तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत असून या संदर्भात नागरिकांनी घाबरुन न जाता अधिक काळजी घ्यावी. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

कोरोना विषाणूसंदर्भात नागरिकांना काही शंका असल्यास तसेच संशयितांच्या आरोग्य तपासणीबाबत माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशातून प्रवास केलेल्या नागरिकांना केंद्र शासनाच्या सूचनेनुसार विलगीकरण (क्वॉरंटाईन) करण्यात येणार आहे. यासाठी विमानतळावर आवश्यक व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील कोरोना विषाणूसंदर्भात करावयाच्या उपाययोजना संदर्भात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच आरोग्य यंत्रणेबाबत राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत बैठकीत निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, डॉ. भावना सोनकुसळे, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणूबाधित एक रुग्ण आढळून आला असून त्याच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकासह इतर 14 नागरिकांचा शोध घेवून त्यांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, विभागात आतापर्यंत 59 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 42 संशयित नागपूरचे तर वर्धा येथील 15संशयितांचा समावेश आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 11 तर वर्धा येथील दोन अशा 14 संशयित निरिक्षणाखाली आहेत. विमानतळावर तपासणीसाठी विशेष तपासणी सुरु असून 604 प्रवाशांची स्क्रीनींग करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 0712-2562668 असा आहे. करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता ठेवणे आवश्यक असून सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, मेळावे, समारंभ टाळावे, असे आवाहन करतांना विभागीय आयुक्त म्हणाले की, शहरातील ट्रॅव्हल एजंट, सिनेमा व्यावसायिक आदींची बैठक घेण्यात येणार आहे. या सार्वजनिक ठिकाणी संपूर्ण स्वच्छता ठेवली जाईल याची खबरदारी घेण्यात येणार आहेत. तसेच संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून तपासणीसाठी आरोग्य विभागात न येता संशयितांच्या घरी जावून नमुने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जनतेनेही न घाबरता या संदर्भात आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोना संदर्भात जनतेमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या संदर्भात आरोग्य विभागातर्फे प्रत्येक गावासाठी एसओपी तयार करण्यात येत असून पुढील पंधरा ते वीस दिवस शहरातील धार्मिक कार्यक्रम, यात्रा आदी कार्यक्रम रद्द करुन नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी सहभाग घेवू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

संपर्कातील सर्वांची तपासणी -जिल्हाधिकारी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्यासाठी नागपुरात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता योग्य ती काळजी घ्यावी. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी एखाद्यास ताप, खोकला असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, आवाहन जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

गर्दीची ठिकाणे टाळावे – तुकाराम मुंढे
नागरिकांनी हात स्वच्छ धुणे, खोकताना-शिंकताना काळजी घ्यावी. खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवणे अशा महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात. सिनेमागृह, मॉल्स, स्विमिंग पुल, मंगल कार्यालये येथे आावश्यकता असल्यासच जावे. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावे. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी देखील महत्त्वपूर्ण आरोग्या सवयी कटाक्षाने पाळाव्यात. जसे सार्वजनिक कार्यक्रमात काही काळ सहभागी होणे टाळा.

हस्तांदोलन टाळा. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. वेळोवेळी तोंडाला स्पर्श करू नका. आवश्यकता नसल्यास सद्य:स्थितीत प्रवास टाळा. शाळांनी देखील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी जनजागृतीपर फलक लावावे. याबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रसार माध्यमांनी भर द्यावा, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी यावेळी केले.

थर्मल स्कॅनिंग सुविधा
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमातळावर थर्मल स्कॅनिंग सुविधा उपलब्ध आहे. कोरोना व्हायरसने बाधित संशयित रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) येथे आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी पुरेसा औषध साठा तसेच मास्क आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे.