Published On : Mon, Jul 8th, 2019

ट्रूजेटच्या विमानाचे नागपुरात नाईट पार्किंग

नागपूर : या महिन्याच्या सुरुवातीला नागपुरातून दोन शहरांसाठी उड्डाण सुरू करणाऱ्या एअरलाईन्स ट्रूजेटने आता मोठा बदल केला आहे. पहिल्यांदा अहमदाबाद आणि हैदराबादकरिता विमान सेवा सुरू करण्याची तयारी करणारी ट्रूजेट आता केवळ अहमदाबादकरिता संचालन करणार आहे. याशिवाय कंपनी विमानाचे नाईट पार्किंग नागपुरात करणार आहे. यासोबतच नागपूर विमानतळावर विमानाचे नाईट पार्किंग सुरू करणारी तिसरी विमान कंपनी ठरणार आहे.

आतापर्यंत इंडिगो एअरलाईन्स आणि गो एअर कंपनीतर्फे विमानाचे नाईट पार्किंग करण्यात येत आहे. मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) सूत्रांनी सांगितले की, ट्रूजेटने नाईट पार्किंगकरिता एमआयएलकडून सवलत मागितली आहे. याकरिता एमआयएल तयार आहे. ट्रूजेटने पूर्वीही नागपुरातून संचालन केले आहे. एमआयएलच्या धोरणानुसार जुन्या आॅपरेटरला सूट देण्यात येत नाही, पण मार्ग नवीन असल्यामुळे एक महिन्यासाठी नाईट पार्किंग मोफत मिळेल.

प्रवाशांची अडचण नाही
प्राप्त माहितीनुसार ट्रूजेट पूर्वी विमान २टी १७९/१८० नागपूर-अहमदाबाद-नागपूर व्यतिरिक्त २टी १८५/१८६ नागपूर-हैदराबाद-नागपूर सेवा सुरू करणार आहे. पण विमानाची उपलब्धता नसल्यामुळे सध्या अहमदाबादकरिता उड्डाण सुरू करण्यात येणार आहे. शेड्यूल व सिस्टीमवर बुकिंग सुरू करण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. पण आता १० जुलैपासून नागपूर ते अहमदाबाद थेट उड्डाण राहणार असल्याची माहिती आहे. सध्या नागपूर ते अहमदाबादकडे थेट उड्डाण नाही. नागपुरातून गुजरातमध्ये खरेदीसाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे कंपनीला प्रवासी संख्येत काहीही अडचण येणार नाही.

एटीआर ७२ सीटचे विमान
ट्रूजेट या उड्डाणासाठी एटीआर ७२ सिटचे विमान चालविणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्येसाठी कंपनीला समस्या येणार नाही. अहमदाबादकरिता थेट विमान सेवा देणाºया ट्रूजेटकरिता नागपुरात सध्या कुणीही स्पर्धक नाही. दुसरीकडे नाईट पार्किंग असल्यामुळे संबंधित मार्गावर कंपनीचे वर्चस्व राहील. ट्रूजेटचे नागपूर-अहमदाबाद विमान
सायंकाळी ७ वाजता आणि परतीसाठी अहमदाबादमध्ये सायंकाळी ५ वाजता उपलब्ध राहील.

हिवाळ्यात वाढणार विमान
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबादकरिता नागपुरातून पूर्वीच विमान सेवा उपलब्ध असल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर सध्या विमान सेवा सुरू करण्याचे कंपनीने टाळले आहे. कंपनीला हैदराबाद आणि नागपूर विमानतळावरून दोन्ही उड्डाणासाठी टाईम स्लॉट देण्यात आला आहे. कंपनीला नागपुरात कार्यालय सुरू करण्यास काहीही अडचण नाही. पूर्वीही नागपुरातून विमानसेवा सुरू केली आहे. कंपनीला कार्यालय सहजरीत्या उपलब्ध होऊ शकते.