Published On : Wed, Jan 1st, 2020

महापौरांच्या हस्ते आरपीटीएस रोडवर वृक्षारोपन

Advertisement

– वृक्ष संवर्धन आणि सुरक्षेसाठी ‘सेल्फ वाटरींग सिस्टीम’

नागपूर– महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते मंगळवारी (ता.३१) आरपीटीएस मार्गावर वृक्षारोपन करण्यात आले. वृक्ष संवर्धन आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी ‘सेल्फ वाटरींग सिस्टीम’ असलेल्या कडूनिंबाच्या रोपांची यावेळी लागवड करण्यात आली.

याप्रसंगी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव, नगरसेवक लखन येरवार, नगरसेविका वनिता दांडेकर, उपायुक्त राजेश मोहिते, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उद्यान निरीक्षक अनंता नागमोते कनिष्ठ अभियंता पी.आर. उकेबांते, नागपूर शहर सौंदर्यीकरण समितीचे समन्वयक दिलीप चिंचमलातपुरे, ‘सेल्फ वाटरींग सिस्टीम’ विकसीत करणारे गौरव टावरी व सतीश टावरी, परिसरातील नागरिक विश्वास सहस्त्रबुद्धे, मुकुंद जोशी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी प्रशांत जोशी, बाबा देशपांडे, रोहित देशपांडे, श्रीकांत देशपांडे, ग्रीन व्‍हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, अनिल राठी आदी उपस्थित होते.

वृक्ष संवर्धन आणि सुरक्षेसाठी ‘सेल्फ वाटरींग सिस्टीम’ नागपूर शहरामध्ये दरवर्षी ११ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे एखाद्या रोडवर कोणत्याही एकाच प्रजातीच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. अजनी चौकाकडे जाणा-या आरपीटीएस रोडवर पूर्णत: कडूनिंबाच्याच झाडांची लागवड करण्यात आली आहे. प्राधान्याने सीमेंट रोडच्या बाजूला वृक्षारोपन केले जात आहे. वृक्षारोपन केल्यानंतर त्यांच्या देखभालीची मोठी जबाबदारी असते. त्यादृष्टीने ‘सेल्फ वाटरींग सिस्टीम’चा यामध्ये अवलंब करण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे वृक्षारोपन केल्यानंतर दोन वर्षपर्यंत झाडांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित प्रणाली विकसीत करणा-यांची आहे.

कमी पाण्यामध्ये झाडांच्या झटपट वाढासाठी पोषक तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही उपयुक्त ‘सेल्फ वाटरींग सिस्टीम’द्वारे हे वृक्षारोपन करण्यात आले. देशात पहिल्यांदाच वृक्षारोपनासाठी या प्रणालीचा अवलंब केला जात आहे. या प्रणालीमुळे १० ते १५ दिवसात एकदाच झाडांना पाणी टाकावे लागते. पाण्याची नासाडी न होता. टाकलेले पाणी थेट रोपट्याच्या मुळापर्यंत पोहोचते. त्यामुळे झाडांची वाढही चांगली होते. या प्रणालीमुळे सुमारे ६० ते ७० टक्के पाण्याची बचत करता येते. नागपूर शहरातील उन्हाळ्यातील तापमान लक्षात घेत झाडांच्या संरक्षणानुसार प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे वर्षभरात केव्हाही वृक्षारोपन करता येउ शकते. विशेष म्हणजे झाडांना लावण्यात येणा-या ट्रीगार्डच्या किंमतीच्या तुलनेत ‘सेल्फ वाटरींग सिस्टीम’ची किंमत कमी आहे. पाणी बचतीसह संरक्षणाच्यादृष्टीने सदर प्रणाली उपयुक्त असल्याची माहिती यावेळी गौरव टावरी यांनी दिली.

शहरातील नागरिक म्हणून प्रत्येकाने वृक्षसंवर्धन करणे आवश्यक आहे. रोडच्या बाजूला वाहन उभी करताना बाजुला असलेल्या झाडांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. नव्याने वृक्षारोपन करण्यात आलेल्या झाडांची पाने तोडू नये ती तोडताना कुणी आढळल्यास त्यांना मज्जाव करण्यात यावा, असे आवाहन मनपा उद्यान विभागातर्फे करण्यात आले आहे.