Published On : Wed, Jan 1st, 2020

स्वच्छ, सुंदर नागपूरसाठी उपद्रव शोध पथकाची कामगीरी महत्वाची : महापौर

– उपद्रव शोध पथकातील नवनियुक्त कर्मचा-यांना मार्गदर्शन

नागपूर : आपले नागपूर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी महानगरपालिकेप्रमाणेच नागरिकांची जबाबदारीपूर्वक वागणूकी अत्यंत आवश्यकता आहे. नियमीत स्वच्छता करूनही अनेक ठिकाणी घाण होतेच. ही घाण आपल्या शहरातील नागरिकांकडूनच तयार होते. यावर शिस्तीचे अंकुश आवश्यक असून ते काम उपद्रव शोध पथकाद्वारे उत्तमरित्या पार पाडले जाते. स्वच्छ, सुंदर नागपूर ही संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकाची कामगिरी अत्यंत महत्वाची आहे, असे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.

Advertisement

मनपाच्या उपद्रव शोध पथकामध्ये नवनियुक्त कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाल येथील मनपाच्या राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये महापौर संदीप जोशी यांच्यासह स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, पथक प्रमुख वीरसेन तांबे आदी उपस्थित होते.

शहर स्वच्छतेसाठी नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. मात्र त्यासाठी आधी मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय ही जाणीव होणे आवश्यक आहे. उपद्रव पसरवून शहर विद्रुप करणा-यांवर कारवाई करून आतापर्यंत विविध ठिकाणी कारवाई करून लाखो रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पथकाचे हात बळकट करण्यासाठी नवीन ११४ कर्मचा-यांची भरती करण्यात आली आहे. आता २०१ संख्या असलेल्या पथकाद्वारे शहरात स्वच्छता राहावी यासाठी नागरिकांमध्ये शिस्त लावण्याचे कार्य होणार आहे. त्यामुळे पथकातील प्रत्येक कर्मचा-यानेही तेवढ्याच जबाबदारीने आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले.

अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मनपाच्या शहरातील सुविधांच्या व्यवस्थापनाची माहिती दिली. पथकातील कर्मचा-यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कसे कार्य करायचे याबाबतही मार्गदर्शन केले. नागरिकांना दंड ठोठावणे हा पथकाचा हेतू नसून उपद्रवींवर अंकुश लावून त्यांच्याकडून पुन्हा उपद्रव होणार नाही अशी कार्यवाही व्हावी, असेही ते म्हणाले.

दहाही झोनमधून निघणार जनजागृती रॅली
शहरामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी उपद्रव शोध पथकातील सर्व कर्मचा-यांद्वारे बुधवारी (ता.१) सकाळी ९ ते ११ वाजतादरम्यान प्रत्येक झोनमधून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. उपद्रव शोध पथकामध्ये झोन निहाय पथक तैनात असून आतापर्यंत पथकामध्ये ८७ जणांचा समावेश होता. यामध्ये नव्याने निवड झालेल्या ११४ कर्मचा-यांची भर पडली आहे. दहाही झोनमध्ये झोन स्तरावरील पथकाद्वारे परिसरात जनजागृती रॅली काढून नागरिकांना शहर अस्वच्छ न करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.

प्लास्टिक पतंग, मांजा, पुष्पगुच्छांच्या प्लास्टिकबाबत कारवाई सुरू
सिंगल यूज प्लास्टिक निर्मूलन अभियानांतर्गत उपद्रव शोध पथकाद्वारे प्लास्टिकच्या पतंग, नायलॉन मांजा तसेच पुष्पगुच्छांना लावण्यात येणा-या प्लास्टिकवरही कारवाईला मंगळवार (ता.३१)पासून सुरूवात झाली आहे. मंगळवारी (ता.३१) आसीनगर झोनमधील एका प्लास्टिक पतंग विक्रेत्यावर कारवाई करून २५ प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आल्या व ५०० रूपये दंडही वसूल करण्यात आला आहे. पतंग विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या पतंग तसेच नायलॉन मांजाची विक्री करणे थांबवावे तसेच पुष्पगुच्छ विक्रेत्यांनी पुष्पगुच्छांसाठी प्लास्टिकचा वापर बंद करावा असे आवाहन करण्यात आले. अन्यथा उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असा इशारा म.न.पा. तर्फे देण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement