Published On : Sun, Jul 1st, 2018

वृक्षलागवड बनले आहे मोठे आंदोलन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

ठाणे : वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेची प्रशंसा केली. भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचविण्याचे मोठे आव्हान असून त्यादृष्टीने आमच्या सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी राज्यातील नद्यांच्या विकासासाठी तयार केलेला आराखडाही मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीवर आधारित “लोकराज्य”च्या जुलै महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवराच्या हस्ते झाले.

१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज सकाळी कल्याण जवळील वरप गाव येथून झाला. या कार्यक्रमास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वन राज्य मंत्री राजे अम्ब्रीश्रराव आत्राम, सपना मुनगंटीवार, सर्वश्री खासदार कपिल पाटील, डॉ.श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार संजय केळकर, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, ज्योती कलानी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, कल्याण डोंबिवली महापौर विनिता राणे, सदगुरू जग्गी वासुदेव, सुभाष घई, आचार्य बाळकृष्ण, विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील,जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी कन्या वन समृद्धी योजनेचा शुभारंभही काही शेतकऱ्यांना रोपे देऊन करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे देखील यावेळी वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, व कल्याण परिसरातील गावकरी देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. शहाड रेल्वेस्थानकाजवळून मुरबाडकडे जाणाऱ्या रत्यावर वरप गाव असून येथील राधा स्वामी सत्संग आश्रमामागील वन विभागाच्या संरक्षित वन सर्व्हे क्र. २५ येथील जमिनीवर मान्यवरांनी विविध वृक्षांची रोपे लावली.

मुख्यमंत्र्यांनी वडाचे तर सुधीर मुनगंटीवार व श्रीमती मुनगंटीवार यांनी आंब्याचे रोप लावले. वरप येथील वन विभागाची ही जवळपास ३१ हेक्टर जागा असून याठिकाणी २२ हजार वृक्षांची लागवड ३१ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पॅरिस समझोत्यात मोदींची मोठी भूमिका

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, विकसित राष्ट्रे पर्यावरणपूरक कामे करण्यात फारशी इच्छुक नसतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकास करू, पण तो पर्यावरणपूरक असेल असे ठामपणे सांगून पॅरिस समझोत्यात मोठी भूमिका बजावली. अनेकांना हे दिवास्वप्न वाटेल पण सुधीरभाऊंच्या नेतृत्वाखाली ही मोहीम संपताना १३ कोटींपेक्षा जास्त वृक्ष लागवड झालेली असेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ४ वर्षांत ५० कोटी वृक्ष लावावयाची असून आचार्य बाळकृष्ण, सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासारख्या मान्यवरांचे योगदान यासाठी मिळत राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

केवळ वृक्ष लावून आम्ही थांबणार नाही आहोत तर दुसऱ्या टप्प्यात जिओ टॅगिंग करण्यात येणार असून प्रामाणिकपणे प्रत्येक रोपांची वाढ नोंद करण्यात येणार आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की आता वाढदिवशी, मंगल प्रसंगी रोपे लावण्याची प्रथा लोकांमध्ये रुजत आहे ही चांगल्या बदलाची सुरुवात आहे.

वनविकासात राज्य आघाडीवर

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मोहिमेमागील आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांतील प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशांत वनसंपदा वाढविण्यात अग्रेसर ठरत असून २७३ स्क्वेअर किमी वन क्षेत्र वाढले आहे, ५० टक्के मॅन्ग्रोव्हची वाढ झाली आहे, ४ हजार ४६५ स्क्वेअर किमी बांबू क्षेत्र वाढत आहे. सदगुरू यांनी नद्यांच्या किनारी वृक्ष लावण्याचा सोडलेला संकल्प मोठा असून यामुळे नदी वाचविण्याच्या प्रयत्नांना बळ येणार आहे.

नागरिकच ऑडीटर

नुसते खड्डे केले आणि झाडे लावली असे होणार नसून तुम्ही प्रत्यक्ष व्हिडीओ क्लिप्सद्वारे प्रत्येक कालावधीतील रोपांची वाढ पाहू शकता. एकप्रकारे नागरिकच या मोहिमेचे ऑडीटर असणार आहेत, असेही वनमंत्री म्हणाले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलतांना म्हणाले की, आजपर्यंतच्या सर्व वनमंत्र्यांत सुधीरभाऊ यांना पहिला क्रमांक दिला पाहिजे. आपली लावलेली झाडे मोठी होत असतांना पाहणे हे मुनगंटीवार यांच्यासाठी मोठे समाधान असेल.

सदगुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या भाषणात सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख ग्रीन वॉरिअर असा केला. ते म्हणाले की, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था ही संतुलित रुपात हातात हात घालून कशी पुढे जाईल ते आपण पाहिले पाहिजे.

सुभाष घई, आचार्य बाळकृष्ण यांनी देखील आपले विचार मांडले. प्रारंभी प्रधान मुख्य वन संरक्षक यु.के.अगरवाल यांनी प्रास्ताविकात या मोहिमेविषयी माहिती दिली. शेवटी प्रधान सचिव विकास खारगे यांनी आभार मानले. ज्योती अंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वन आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा सुरेख सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

लोकराज्य अंकाची प्रशंसा

मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते लोकराज्यच्या १३ कोटी वृक्ष लागवड विशेषांकाचे प्रकाशनही झाले. या अंकाचे अतिथी संपादक वनमंत्री स्वत: आहेत. या अंकात १३ कोटी वृक्ष लागवडीची संकल्पना, झाडे कशी लावावीत, हरित क्रांती, बांबूचे महत्व, वन भ्रमंती, बहुपर्यायी वृक्ष, वनराईचे महत्व, व्याघ्र संवर्धन आदि विषयांवर विविध तज्ञ मंडळीनी लेख लिहिले आहेत. या अंकाची किंमत १० रुपये असून तो सर्वत्र उपलब्ध आहे.

कार्यक्रमस्थळी लोकराज्यचा हा अंक पाहण्यासाठी एकाच झुंबड उडाली होती. उपस्थित प्रेक्षक या अंकाचे उत्सुकतेने वाचन करतांना दिसत होते.