Published On : Wed, Mar 28th, 2018

स्वतंत्र विदर्भासाठी तृतीयपंथीयांचं 10 दिवस उपोषण

Advertisement


नागपूर: स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विविध पक्षांच्या नेत्यांसह सामान्य नागरिकही रस्त्यावर उतरलेले पाहिले आहेत. पण आता या मागणीला थेट किन्नर समाज अर्थात तृतीयपंथीयांचाही पाठिंबा मिळाला आहे.

वेगळ्या विदर्भासाठी नागपुरात तृतीयपंथीयांनी दहा दिवसांचं उपोषण सुरु केलं आहे. अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉकच्या बॅनरखाली इतवारीमधल्या विदर्भ चंडिता मंदिर परिसरात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. किन्नर समाजाचे नेता उत्तमबाबा सेनापती आणि त्यांचे अनुयायी आंदोलनात सहभागी झाले आहेत .

ही मंडळी दहा दिवस इथे साखळी उपोषण करणार आहेत. सरकार हाय हायच्या घोषणा देत आणि खास किन्नर समाजाच्या प्रथेप्रमाणे टाळ्या वाजवत निषेध सुरु आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झालं तर शेतकरी, सामान्य जनतेचे भलं होईल, असं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, किन्नरांची विदर्भाची मागणी इथेच थांबणार नसून हे आंदोलन पुढे कसे न्यायचं ह्याचाही प्लॅन तयार आहे. दहा दिवसांच्या उपोषणानंतर ही मंडळी मोर्चा काढणार आहेत. तरीही शासनाने स्वतंत्र विदर्भाची मागणी मान्य केली नाही, तर आंदोलन उग्र रुप धारण करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.