Published On : Thu, Jun 18th, 2020

मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ४५ दिवसांत केली किमया : ४५० बेडसह ५० बेड्‌सचा अतिदक्षता विभाग

नागपूर :- कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात संधीचे सोने करत नागपूर महानगरपालिकेने सर्व सुविधा युक्त सुसज्ज दोन नवीन रुग्णालय तयार केले आणि तीन रुग्णालयामध्ये क्षमता वाढ केली आहे. नागपूर महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अवघ्या ४५ दिवसात आरोग्य सेवेबाबत ही किमया घडवून आणली आहे. पहिल्यांदा नागपूर महापालिकेनी शहराच्या जनतेसाठी ४५० खाटा असलेली पाच रुग्णालय अत्याधुनिक आरोग्य सुविधासह उपलब्ध करुन दिली आहे. याच्यातून ३०० खाटांचे रुग्णालय तयार आहे आणि उर्वरीत १५० खाटांचे रुग्णालय पुढच्या ७ दिवसात सज्ज होतील.

महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोरोना कंट्रोल रुम मध्ये या संदर्भात घोषणा केली होती त्यानुसार केवळ ४५ दिवसांत हे शक्य झाले आहे. इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा आणि पाचपावली स्त्री रुग्णालय चा पूर्ण कायापलट झाला आहे. कुठल्या ही खाजगी रुग्णालय आणि कार्पोरेट कार्यालयांना लाजवेल, असे या रुग्णालयाचे रुप पलटले आहे.

इंदिरा गांधी रुग्णालयाची क्षमता केवल ३० खाटांची होती, आज ती वाढून १३० झाली आहे. येथे आई.सी.यू. आणि ऑक्सीजनची सुध्दा व्यवस्था केली गेली आहे. तळ मजला सोबत तीन माळयाचे हे रुग्णालय कित्येक वर्षापासून दुर्लक्षीत होते पण आता पूर्णपणे कायापालट झाला आहे.

२० खाटांची क्षमता असलेले आयसोलेशन हॉस्पीटल ३२ खाटांची सुविधा तयार झाली आहे. याची क्षमता ६० पर्यंत करण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा सुध्दा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. पूर्वीचे पाचपावली सूतिकागृह आता पाचपावली स्त्री रुग्णालय झाले असून पूर्वी त्याची क्षमता २० खाटांची होती आता हे रुग्णालय आता ११० खाटांचे झाले आहे. के.टी.नगर हॉस्पीटल आणि आयुष हॉस्पीटल सदर हे पूर्णत- नवीन असून त्यांची क्षमता अनुक्रमे १२० आणि ३० खाटांची आहे.

पाचही रुग्णालये मिळून ४५० खाटांची क्षमता तयार केली आहे. प्रत्येक बेडला सेन्ट्रल आक्सीजन आणि सेन्ट्रल सक्शनाची सोय आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, पांचपावली स्त्री रुग्णालय आणि के.टी.नगर रुग्णालयात ५० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. या सर्व रुग्णालयामध्ये नवीन बेडस लावण्यात आले आहे. टाइल्स, बाथरुम, टॉयलेटस, लिफट आदीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मल्टीपॅरा कार्डियक मॉनिटर, ई.सी.जी., सोनोग्राफी मशीन, एक्सरे मशीनची सुविधा राहणार आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि के.टी.नगर मध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागपूर महापालिकेकडे नगरवासियांसाठी उत्तम आरोग्य सेवेची सुविधा अगोदर नव्हती. लॉकडाऊनमध्ये भेटलेल्या संधीचा लाभ घेत मनपानी पाच रुग्णालयांचे निर्माण कार्य केले आहे. या रुग्णालयांमध्ये ४५० खाटांची व्यवस्था केली आहे. यापैकी ३०० खाटांचे रुग्णालय तयार आहे आणि १५० खाटांचे रुग्णालय पुढच्या ७ दिवसात तयार होतील. या रुग्णालयांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उध्दव ठाकरे यांनी एस.डी.आर.एफ मधून ‍निधी उपलब्ध करुन दिला आहे. याव्यतिरिक्त डी.पी.सी आणि मनपा निधी ही खर्च करण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेचे एवढी क्षमता असणारे रुग्णालय नव्हते. माननीय मुख्यमंत्री यांनी संस्था उभी करण्याचा मंत्र दिला होता त्याची परिपूर्ति आम्ही केली आहे. आयुक्तांनी नागरिकांना या आरोग्य सुविधेचे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.