Published On : Thu, Jun 18th, 2020

महापौरांनी घेतली स्मार्ट सिटी ची झाडाझडती

Advertisement

आवश्यक कागदपत्रे २४ तासात सादर करण्याचे निर्देश

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) च्या कार्याची गुरूवारी (ता.१८) महापौर तथा स्मार्ट सिटीचे संचालक संदीप जोशी यांनी ‘इन कॅमेरा’ झाडाझडती घेतली. यावेळी महापौरांसह स्मार्ट सिटीचे सर्व संचालक स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बहुजन समाज पक्षाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित होते.

स्मार्ट सिटीच्या कंपनी कायद्यानुसार महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते व सर्व गटनेते स्मार्ट सिटीचे संचालक आहेत. कायद्यानुसार स्मार्ट सिटीतर्फे घेण्यात आलेले निर्णय किंवा केलेल्या कोणत्याही कामाची माहिती संचालकांना देणे बंधनकारक आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून संचालक मंडळातील कुणालाही कुठलिही माहिती देण्यात आली नाही. यासंबंधी आढावा घेण्यासाठी स्वत: महापौर संदीप जोशी व इतर पाच संचालकांनी मनपा मुख्यालयातील नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) च्या कार्यालयात बैठकीत झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे संपूर्ण बैठकीचे व्हिडिओ रेकर्डिंग करण्यात आले.

या बैठकीत एनएसएससीडीसीएल चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे, कंपनी सचिव अनुप्रिया ठाकुर, एच.आर.प्रमुख अर्चना अडसड, लेखाधिकारी अमृता देशकर, सोनाली गेडाम, विधी अधिकारी मंजित नेवारे, ई-गव्हर्नन्सचे महाव्यवस्थापक शील घुले आदी उपस्थित होते.

नागपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीमध्ये कोणताही गैरप्रकार होउ नये किंवा गडबड होउ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. येथे जर कोणतिही गडबडी झाली तर त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचे नाव बदनाम होईल, त्यामुळे नियमानुसार व शासनाच्या निर्देशाप्रमाणेच सर्वांची वागणूक असावी, अशी अपेक्षा यावेळी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेले निर्णय व केलेले कार्य या सर्वांची आवश्यक कागदपत्रे येत्या २४ तासात सादर करण्याचे सक्त निर्देशही यावेळी महापौरांनी दिले.