मुंबई : महाराष्ट्रात स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बदल्यांच्या मालिकेत आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट झाली आहेत. याआधीही राज्य सरकारने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली व पदोन्नती केली होती. आता नव्या आदेशानुसार पाच अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
नवीन बदली आदेशानुसार खालील बदल्या करण्यात आल्या :
अजीज शेख – व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई येथून बदली करून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे पदावर नियुक्ती.
अशीमा मित्तल – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक येथून बदली करून जिल्हाधिकारी, जालना पदाची जबाबदारी.
श्रीकृष्णनाथ पांचाळ – जिल्हाधिकारी, जालना येथून बदली होऊन आता जिल्हाधिकारी, ठाणे या पदावर नियुक्त.
विकास खारगे – मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेले खारगे यांची अपर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय मुंबई येथे बदली.
अनिल डिग्गीकर – दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव पद सोडून आता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सरकारने ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. याशिवाय २० अधिकाऱ्यांच्या बदल्या व काहींच्या पदोन्नतीचेही आदेश निघाले होते. आगामी काळात आणखी बदल्या होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा प्रशासनात आहे.