Published On : Fri, Apr 24th, 2020

बेघर निवारा केंद्रातील रहिवाश्यांना मनपातर्फे मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना : मानसिक समुपदेशनासह शारिरीक व्यायाम आणि मनोरंजक खेळ

नागपूर: कामासाठी नागपूर शहरात आलेल्या व लॉकडाउनमुळे शहरातच अडकलेल्या नागरिकांसाठी मनपाचे बेघर निवारा केंद्र वरदान ठरत आहेत. निवारा केंद्रामध्ये आश्रयाला असलेल्या नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जात आहेच. मात्र मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून येथील महिला व पुरूष निवासीतांना कौशल्य प्रशिक्षणाचेही धडे दिले जात आहेत. रवीनगर येथील अग्रसेन भवन येथील मनपाच्या बेघर निवारा केंद्रामधील रहिवाश्यांना मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यासोबतच त्यांचे मानसिक समुपदेशनही मनपा करीत आहे. शारिरीक व्यायामासह मनोरंजनासाठी विविध खेळांचेही आयोजन या निवारा केंद्रामध्ये केले जात आहे.

अग्रसेन भवन रवीनगर येथील मनपाच्या बेघर निवारा केंद्रामध्ये १४९ महिला व पुरूष रहिवासी आहेत. या सर्व रहिवाश्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा मनपातर्फे पुरविण्यात येत आहे. या निवारा केंद्रामध्ये सुरूवातील एकूण १५१ निवासीत होते. मात्र दोन जण निवारा केंद्रातून गेल्यानंतर आता १४९ महिला, पुरूष आणि लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांच्या सकस आहारासह त्यांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी मनपा घेत आहे. सर्व रहिवाश्यांचे नियमीत मानसिक समुपदेशन केले जाते. त्यांच्या शारिरीक आरोग्याच्यासाठी सकाळी योगाचे धडे दिले जातात तर कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, लगोरी यासारख्या खेळांचेही आयोजन दररोज केले जाते. यासह त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. याच कौशल्य प्रशिक्षणा अंतर्गत निवारा केंद्रामध्ये महिला व पुरूषांना मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. चार महिला व दोन पुरूष अशा गटात सर्व रहिवाश्यांची विभागणी करून त्यांना सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत बॅचनिहाय प्रशिक्षण दिले जात आहे. मनपाच्या स्वाती गभने सर्व रहिवाश्यांना मास्कचे प्रशिक्षण देत आहेत. यासह त्यांना सौर उर्जेबाबत माहिती दिली जात असून सुतार काम, पक्ष्यांची घरटी तयार करणे, शोभेच्या वस्तू निर्मितीचेही प्रशिक्षण दिले जात आहे. लहान मुलांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना खेळणी आणि चित्रकलेचे प्रशिक्षण दिले जात आहे.

शारिरीक स्वच्छतेची विशेष काळजी घेत पुरूष रहिवाश्यांचे दाढी, केश कर्तन केले जाते. तर लहान मुलांचेही नियमीत केश कर्तन करून देण्यात येते. वैद्यकीय सुविधेच्या दृष्टीने निवारा केंद्रामध्ये प्रथमोपचार बॉक्सची व्यवस्था आहे. याशिवाय सर्व रहिवाश्यांची दररोज तपासणी करून आवश्यक तो औषधोपचार केला जातो. दर आठवड्याला महिलांना आवश्यक साहित्याच्या किटचे वितरण केले जाते. या किटमध्ये साबण, टूथपेस्ट, मेकअपचे साहित्य, सॅनिटायजर, टिकली, सॅनिटरी पॅड, व्हिटॅमिन सी च्या गोळ्या, कंगवा, कपडे धुण्याचे पावडर आदी आवश्यक साहित्याचा समावेश असतो.

मनपातर्फे सकाळी चहा आणि नाश्ता तर दुपारी जेवण त्यांनतर पुन्हा चहा आणि नाश्ता व रात्री जेवण पुरविले जाते. बहुतांशी लोक परराज्यातील असल्याने त्यांच्या प्रदेशाच्या अनुकूल जेवणाची व्यवस्था केली जात आहे. भात, भाजी, वरण, पोळीसह कांदा, लोणचं, टमाटर, हिरवी मिरची, ताक किंवा दही आदींचा दैनंदिन आहारात समावेश असतो. तर नाश्त्यामध्ये पोहा, उपमा, बिस्कीट दिले जाते. सर्व रहिवाश्यांना आवश्यक साहित्याचा पुरवठा आणि त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेकरिता सर्व उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी मनपातर्फे देवेंद्र क्षीरसागर अग्रसेन भवन निवारा केंद्राच्या देखरेखीचे काम पाहतात.