Published On : Wed, Feb 10th, 2021

सीमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

Advertisement

मनपा आयुक्तांचे आदेश : दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्ग, आजाद चौक ते लाकडी पूल आणि झेंडा चौक ते सक्करदरा चौकापर्यंतची वाहतूक प्रतिबंधित

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्ग, आजाद चौक ते लाकडी पूल आणि झेंडा चौक ते सक्करदरा चौक या मार्गांवरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ पॅकेज क्रमांक ९ मधील रस्ता क्रमांक ३५ दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गापर्यंतपर्यंत सीमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील उजव्या बाजूची वाहतूक १० फेब्रुवारी ते ३० एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे. सदर मार्गावरील वाहतूक डाव्‍या बाजूने व लगतच्या रस्त्यावरून वळविण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.

याशिवाय सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत १० पॅकेजेसमधील पॅकेज क्रमांक २, रस्ता क्रमांक ३ आजाद चौक ते लाकडी पूल व झेंडा चौक ते सक्करदरा चौक जुनी शुक्रवारी पर्यंतच्या रस्त्यावर सीमेंट रोड कार्य प्रस्तावित आहे. या कामाकरिता सदर मार्गांवरील वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार आहे. त्यानुसार १० फेब्रुवारीपासून ३१ मार्च पर्यंत आजाद चौक ते लाकडी पूल व झेंडा चौक ते भोला गणेश चौक पर्यंत उजव्‍या बाजुकडील रस्ता कोणत्याही वाहतुकीस बंद करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. या मार्गावरील वाहतूक डाव्‍या बाजूने व लगतच्या रस्त्यावरून वळविण्यात येईल.

सुरक्षेची काळजी घेणे अनिवार्य
उपरोक्त सर्व मार्गांवरील काम पूर्ण करताना कामाचे संबंधित कंत्राटदार व कार्यकारी अभियंता यांनी सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार कामाच्या ठिकाणी सुचना फलक लावणे, त्यावर काम सुरू झाल्याची व पूर्ण करण्याची तारीख तसेच कंत्राटदाराचे नाव व संपर्क क्रमांक नमूद असावे, पर्यायी मार्ग सुरू होण्याच्या दोन्ही टोकावर बॅरिकेट्स तसेच वाहतूक सुरक्षा रक्षक नेमणे, पर्यायी मार्ग सुरू होण्याच्या ठिकाणी वळण मार्गाची माहितीचे फलक लावणे, वाहतूक चिन्हाच्या पाट्या लावणे, जमिनीतून काढण्यात येणारी माती रस्त्यावर येणार नाही यासाठी व्यवस्था करणे, रात्रीचे वेळी वाहन चालकांच्या माहितीकरीता एलईडी डायव्हर्शन बोर्ड लावणे, वाहतूक नियमांचे व वाहतूक पोलिसांनी दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे, असेही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशात नमूद केले आहे.