Published On : Sat, Jul 30th, 2022

व्‍याघ्र व वन्‍यप्राणी संरक्षणाची घेतली शपथ

Advertisement

– रोटरी एलिट व एशियाटीक बिगकॅट सोसायटीने साजरा केला व्‍याघ्र दिन

नागपूर– रोटरी क्‍लब ऑफ नागपूर इलिट आणि एशियाटीक बिग कॅट सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आंतरराष्‍ट्रीय व्‍याघ्र दिनानिमित्‍त रॉयल पॉल्‍म्‍स, सेमिनरी हिल्‍स येथे व्‍याघ्र जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमात उपस्‍थ‍ित सर्वांनी व्‍याघ्र व वन्‍यप्राणी संरक्षणाची शपथ घेतली.

कार्यक्रमाला माजी प्रधान मुख्‍य वन संरक्षक प्रकाश ठोसरे, आमदार निलय नाईक, माजी मुख्‍य संरक्षक थापलियाल, एशियाटीक बिग कॅट सोसायटीचे सचिव अजय पाटील, वन अधिकारी किशोर मिश्रीकोटकर, वन अधिकारी कुंदन हाते, रेड्डी, बंटी मुल्‍ला, प्रगती पाटील, रोटरी एलिटचे अध्‍यक्ष शुभंकर पाटील, अक्षित खोसला, शिवांगी गर्ग, कशीश वाणी, करण जोतवानी, अभिषेक कपूर, विवेक अग्रवाल, अल्‍का तायडे, विवेक सिंग, रोटरी एक्‍सचेंजचे परदेशी विद्यार्थी, सोनू खान तसेच, सामाजिक कार्यकर्ते सोनू खान आदींची उपस्‍थ‍िती होती. सुरुवातीला कोरड्या विहीरीत पडलेल्‍या वाघीणीवर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्‍यात आला. त्‍याबद्दल अधिक माहिती देताना कुंदन हाते म्हणाले, राज्‍यातील व देशातील 2011 साली घडलेली पहिली घटना होती. कोरड्या विहीरीत पडलेल्‍या या वाघीणीला अतिशय शिताफीने बाहेर काढले, तिच्‍यावर उपचार केले गेले आणि परत तिला जंगलात सोडण्‍यात आले. वनविभागाद्वारे त्‍यासाठी केले गेलेले प्रयत्‍न अतिशय कौतूकास्‍पद होते.

निलेश नाईक यांनी निसर्ग व मानवी जीवाच्‍या कल्‍याणासाठी वन्‍यजीवांचे संरक्षण करणे किती गरजेचे आहे यावर भाष्‍य केले. प्रकाश ठोसरे म्‍हणाले, जंगल हा आपल्‍या देशाचा अभिमान आहे. ती आपली भूषणावह परंपरा आहे, तिचे जतन करणे मानवी अस्तित्‍वासाठी अतिशय महत्‍वाचे आहे.
प्रास्‍ताविकातून अजय पाटील यांनी आंतरराष्‍ट्रीय व्‍याघ्र दिनाचे महत्‍त्‍व सांगितले व वाघांचा बचाव करण्‍यासाठी जनजागृती करण्‍याची गरज असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवांगी गर्ग यांनी केले. वाघावर आधारित माहितीपट यावेळी प्रदर्शित करण्‍यात आला.