Published On : Sat, Jan 25th, 2020

आजचे विद्यार्थी नव्या भारताचे शिल्पकार : नितीन गडकरी

विज्ञान महोत्सव व्हिजन 2020 चा समारोप

नागपूर: भारत हा एक प्रगतीशील देश आहे व विज्ञानाच्या माध्यमातून प्रगती मोठ्या प्रमाणावर केली जाऊ शकते. आजचे विद्यार्थी हे नव्या भारताचे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग, सडक परिवहन व लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस उपस्थित होते.

नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत माय सायन्स लॅब, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण विभागाच्या सहकार्याने 23, 24 व 25 जानेवारी रोजी विज्ञान महोत्सव 2020चे आयोजन करण्यात आले होते.

यंदाचा विज्ञान महोत्सव माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या इंडिया व्हिजन 2020 वर आधारित होता. या विज्ञान महोत्सवाचे वैशिष्ट म्हणजे शाळेपासून तर आयआयटीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले दर्जेदार प्रयोग आणि प्रयोगातून तयार झालेले उत्पादन सादर केले. दर्जेदार प्रयोगांना माय सायन्स लॅबच्या वेबसाईटवर प्रकाशित केल्या जाणार आहे.

या महोत्सवात संगीत आणि विज्ञान यावर डॉ. तनुजा नाफडे, तंत्रज्ञान यावर डॉ. प्रशांत कडू आणि टेक्नॉलॉजीबाबत अविनाश गायकवाड आणि टेक्नॉलॉजी उद्योजकता यावर सामवेद इंटरनॅशनलचे मुकुंद पात्रीकर यांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: विज्ञान प्रदर्शनातील मॉडेल पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 23 जानेवारी रोजी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली येथील एकल विद्यालय फाऊंडेशनचे अध्यक्ष रवीदेवजी गुप्ता तसेच अप्पर आयुक्त आदिवासी विकास संदीप राठोड व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस उपस्थित होते. समारोपाच्या कार्यक्रमाला आ. ना.गो. गाणार, आ. डॉ. एन.एन. पटवे, शिक्षणाधिकारी रवींद्र खामकर, रवींद्र फडणवीस, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती वंदना भागडीकर उपस्थित होते.

विज्ञान महोत्सवाचे आकर्षण म्हणजे सुपारीच्या प्लेटवर विज्ञान चित्रकला स्पर्धा, शिक्षकांसाठी इनोवेटिव्ह मॉडेल तयार करण्याची मोफत कार्यशाळा आणि पालक व विद्यार्थी विज्ञानावर आधारित खेळांचे आयोजन केले होते. या महोत्सवात विदर्भातील अनेक शाळांमधील 102 विद्यार्थ्यांनी आपले वैज्ञानिक मॉडेल प्रदर्शित केले होते. आदिवासी भागातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखील प्रदर्शनात सहभाग घेतला होता. सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांनी या विज्ञान महोत्सवास भेट दिली.