नवी दिल्ली : बुधवार आज ९ जुलै रोजी देशभरात ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले असून, यामुळे सामान्य जनतेच्या दिनक्रमावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात १० केंद्रीय कामगार संघटनांनी या संपाची हाक दिली आहे. औद्योगिक धोरणे उद्योगपतींच्या हिताची असून, कामगारांच्या विरोधात जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. शेतकरी आणि ग्रामीण कामगार संघटनांनीही या आंदोलनात साथ दिली आहे.
सुमारे २५ कोटी कामगार बंदमध्ये सहभागी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. परिणामी, अनेक सेवा विस्कळीत होण्याची चिन्हं आहेत.
काय होणार बंद?
बँक व्यवहारांवर परिणाम:
काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे बँक शाखांचे व्यवहार, चेक क्लिअरिंग आणि ग्राहक सेवा यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बँकिंग युनियन्सने स्पष्ट भूमिका घेतलेली नसली, तरी काही शाखा बंद राहू शकतात.
वाहतूक व्यवस्थेवर परिणाम:
एसटी कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे राज्य परिवहन सेवा मर्यादित स्वरूपात सुरू राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी बस फेऱ्या बंद पडू शकतात.
कॅब, रिक्षा आणि खासगी वाहनांची संख्याही कमी होऊ शकते.
रेल्वे संघटना बंदमध्ये सहभागी नसल्या तरी काही राज्यांत निदर्शकांनी रेल्वे स्थानकांवर आंदोलन केल्याची शक्यता असल्यामुळे लोकल आणि प्रवासी गाड्या उशिरा धावू शकतात.
काय सुरू राहणार?
शाळा आणि महाविद्यालये:
शालेय शिक्षण विभागाने कोणतीही बंदची अधिकृत सूचना दिलेली नाही. मात्र, काही भागांत सुरक्षेच्या कारणास्तव शाळा आणि महाविद्यालये स्वेच्छेने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
रुग्णालय आणि अत्यावश्यक सेवा:
अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू राहतील. रुग्णवाहिका, रुग्णालये आणि आपत्कालीन सेवांवर बंदचा परिणाम होण्याची शक्यता नाही.
खाजगी कंपन्यांचा ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय:
काही खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे.
नागरिकांसाठी सूचना :
प्रवास करायचा असल्यास रेल्वे व बसच्या वेळा तपासूनच घराबाहेर पडा.
विद्यार्थ्यांनी शाळा सुरू आहे की नाही, याची खात्री करूनच निघा.
अनावश्यक प्रवास टाळणेच शहाणपणाचे ठरेल.
तुमच्या भागात बंदचा किती प्रभाव आहे, हे स्थानिक संघटनांच्या सक्रीयतेवर अवलंबून असेल.
एकंदरीत, भारत बंदमुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.