मुंबई : मुंबईतील आमदार निवासात कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी निवासातील कँटीनमधील जेवणाच्या कारणावरून एका कर्मचाऱ्याला चक्क बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
या धक्कादायक प्रकारावर खासदार संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. “हे चित्र सत्य असेल, तर तुमची भूमिका काय आहे? तुमच्या राज्यात गरीब, दुर्बलांचं हेच हाल होतं का?” असा प्रश्न उपस्थित करत राऊतांनी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
घटना अशी घडली की, आमदार गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील खोली क्रमांक १०७ मध्ये जेवण मागवले होते. मात्र, जेवण निकृष्ट असल्याचा दावा करत त्यांनी थेट कँटीनमध्ये धाव घेतली आणि तेथील कर्मचाऱ्याला हाताचा चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनीही मारहाण करण्यात सहभाग घेतल्याचं दिसून आलं.
या प्रकारामुळे विरोधकांनी सत्ताधारी युतीवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या मित्रपक्षात असलेल्या शिवसेनेचे आमदार असल्यामुळे याप्रकरणी कोणतीही कारवाई होणार नाही, असा आरोपही सोशल मीडियावर केला जात आहे.
आमदाराच्या गैरवर्तनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सामान्य नागरिकांत संतापाची लाट असून, या घटनेवर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.