Published On : Sun, Sep 3rd, 2017

राज्यातील प्रमुख शहरामध्ये पोलीसांबद्दल लोकांच्या अपेक्षा व आकलनासंदर्भात सर्वेक्षण करणार -देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर: पोलीस प्रशासनाबद्दल जनतेच्या अपेक्षा, वागणूक, कार्यात्मक परिणामकारकता, जनमानसातील प्रतिमा यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या तुलनात्मक निकषांवर नागपूर पोलीसांची लक्षणीय प्रगती झाल्याचा निष्कर्ष समोर आला असून त्यानुसार योग्य दिशेने वाटचाल सुरु असली तरी यापुढे अधिक चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी वाढली आहे. नागपूरच्या धर्तीवर राज्यातील इतर प्रमुख शहरातही जनतेच्या पोलीसांबाबत अपेक्षा व आकलनासंदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

नागपूर शहर पोलीस प्रशासनासंदर्भात येथील तिरपुडे इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्षाचे सादरीकरण येथील परसिस्टंट कंपनीच्या कालिदास ऑडिटोरियम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस स्टेशन, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्याक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी खासदार अजय संचेती, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, सुनिल केदार, प्रकाश गजभिये, प्रा. अनिल सोले, समीर मेघे, परिणय फुके, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु सिध्दार्थ विनायक काणे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दिपक म्हैसेकर, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, तसेच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर शहरातील प्रभावी पोलीस प्रशासनाबद्दलच्या अपेक्षा आणि आकलनाचे सर्वेक्षण करताना सन 2014 व 2017 मधील तुलनात्मक निष्कर्ष समोर आले आहेत. गुणात्मक बदलाबद्दल सकारात्मक निष्कर्ष आले असून यासाठी पोलीस आयुक्तांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुन्हांची संख्या, यशस्वी तपास आणि अपराध सिध्दी या पारंपारिक निकषासोबतच सामान्य जनतेमध्ये पोलीसांबद्दल असलेला विश्वास, तसेच कामाबद्दल करण्यात आलेल्या सर्वेक्षणामधून मुल्यमापन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे केलेल्या सकारात्मक बदलासोबतच पुढील दिशाही ठरणार आहे. तिरपुडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आधुनिक व तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण सर्वेक्षणाचे कार्य केल्यामुळेच पोलीसांची जनमानसातील प्रतिमा, वागणूक, संपर्क क्षमता याबद्दलचा स्पष्ट निष्कर्ष साधार काढण्यात आला आहे. या निष्कर्षामुळेच जनतेचा पोलीसांबद्दल आत्मविश्वास वाढणार असून सहकार्याची भावना निर्माण होणार आहे.

ब्रिटीश काळात पोलीस यंत्रणा ही साम्राज्याच्या सेवेसाठी होती. परंतु हा विभाग आता जनतेला सेवा देणारा, तसेच कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणारी महत्वाची यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. त्यादुष्टीने पोलीस विभाग योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेच्या विश्वास संपादन करण्यास हा विभाग यशस्वी ठरत असतानाच महिलांच्या संरक्षणासाठी भरोसा सेलची निर्मिती, भूखंड माफियांच्या विरुध्दात विशेष पथक, वाहतूक सुधारण्यासाठी एन ट्रॅक्स, तसेच एन कॉप्स एक्सलन्सच्या माध्यमातून नागपूर पोलीसांनी कार्यक्षमता सिध्द केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हयाचे प्रमाणा कमी करण्यासोबतच संपूर्ण शहरात सी.सी. टीव्ही सर्वेलन्स अंतर्गत कायदा व सुव्यवस्था तसेच स्मार्ट शहराच्या दुष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.

पासपोर्टचा कालावधी चौवीस तासावर

पासपोर्ट मिळण्यासाठी आवश्यक असलेली पोलीस तपासणी अहवाल उपलब्ध व्हायला सहा दिवशापेक्षा जास्त कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्यासाठी मुंबईमध्ये ज्या पध्दतीने चोवीस तासात ऑनलाईन तपासणी करुन पासपोर्ट देण्याची व्यवस्था आहे, त्याच पध्दतीने नागपूर शहरातही ही व्यवस्था सुरु करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. पासपोर्ट संदर्भात सीसीटीएनएसच्या माध्यमातून व्यक्तीची तपासणी करताना लागणारा कालावधी अधिक कमी करण्यासाठी बॉयोमेट्रीक व अधार क्रमांकाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यामुळे तात्काळ पासपोर्ट देणे सूलभ होणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् म्हणाले की, नागपूर पोलीसांबद्दल अपेक्षा आणि आकलनासंदर्भाचे व्यापक सर्वेक्षण पहिल्यांदाच करण्यात आले असून यापूर्वी केलेले सर्वेक्षण व सध्याचे सर्वेक्षण यामुळे तुलनात्मक झालेला बदलामुळे पोलीसांच्या कार्यक्षमता वाढणार आहे. पोलीसांची सामान्य जनतेमध्ये असलेल्या प्रतिमेमध्ये 157 टक्के, पोलीसांची वागणूक यामध्ये 147 टक्के, कार्यात्मक परिणामतेमध्ये 135 टक्के, संपर्क क्षमतेमध्ये 108 टक्के तसेच जागृकता 36 टक्के तर पोलीसांना पाठिंबा देण्याच्या जनतेच्या तयारीमध्ये 85 टक्के वाढ झाली आहे. नागपूर पोलीसांनी राबविलेल्या मागील दोन वर्षातील विविध उपक्रमामुळेच नागपूर पोलीसांचे गुणपत्रकामध्ये अमुलाग्रह बदल झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर शहर हे नशामुक्त शहर ‘ड्रग्स फ्री शहर’ तसेच ‘भिकारीमुक्त शहर’ करण्याचा मानस असून यासाठी रस्त्यावर भिक मागणारी मुले शाळेत असायला हवी व रस्त्यावर कोणीही भिक मागू नये यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरलेल्या पोलीस स्टेशनमध्ये कोराडी, पाचपावली, धंतोली, प्रतापनगर, नंदनवन, अजनी, जुनी कामठी तसेच वाहतूक पोलीसाविषयी सज्जतेसाठी एमआयडीसी, स्त्रियांच्या सुरक्षिता प्रदान करण्यासाठी एमआयडीसी पोलीसांना स्मृती चिन्ह देवून गौरव केला. तसेच भरोसा सेल, एन कॉप्स, वाहतूक आदी सुधारणाबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

शहरातील पोलीस प्रशासनाबद्दल अपेक्षा आणि आकलनबद्दलचे सर्वेक्षण येथील तिरपुडे व्यवस्थापन शिक्षण महाविद्यालयातर्फे करण्यात आले या प्रकल्प प्रमुख डॉ. ललित खुल्लर यांनी सर्वेक्षणासंदर्भात सादरीकरण करुन प्रगती पुस्तक तसेच जनतेच्या अपेक्षेनुसार आवश्यक असलेल्या बदला संदर्भातही माहिती दिली. प्रास्ताविक सहपोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उपपोलीस आयुक्त राहूल माकणीकर यांनी तर आभार प्रदर्शन सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी मानले.