Published On : Sun, Sep 3rd, 2017

शिव आरोग्य बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून महिनाभरात मुंबईतील 232 रुग्णांवर आपत्कालीन परिस्थितीत उपचार आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती

Advertisement

मुंबई: आरोग्य विभागाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवआरोग्य बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून महिनाभरात २३२ रुग्णांना आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, २ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाला मुंबईत सामान्य नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र गेल्या महिन्याभरातील आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या महिनाभरात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अडचणीत सापडलेल्या रुग्णांसाठी ही सेवा उपयुक्त ठरली आहे. 232 केसेसमध्ये प्रामुख्याने 32 बेशुद्ध रुग्णांना वेळेवर उपचार करण्यात आले. त्याखालोखाल तापाचे 16, श्वास घेण्यात अडचण येत असलेले 25 रुग्ण, हृदयविकाराचा त्रास जाणवणाऱ्या 24 तर पोटदुखीच्या 14 रुग्णांना वेळीच बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून उपचार देण्यात आले.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 40, गोरेगाव फिल्म सिटी भागातून 37, चिता कॅम्प भागातून 30, अशोक टेकडी भागातून 26, नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 24 अशाप्रकारे 232 रुग्णांना सेवा देण्यात आली.

मालाड येथील ७० वर्षीय वृद्ध रुग्णास लकव्याचा त्रास होऊ लागल्याने १०८ या क्रमांकर कॉल करण्यात आला. बाईक ॲम्ब्युलन्सने तत्काळ घटनास्थळी पोहोचून रुग्णावर प्रथमोपचार केले. गोरेगाव भागातील ४३ वर्षीय रुग्ण बेशुद्ध पडला असता बाईक ॲम्ब्युलन्सशी संपर्क साधण्यात आला.या परिस्थितीत देखील कुठलाही वेळ न दवडता बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णावर प्रथमोपचार करण्यात आले. रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. गोरेगाव येथील ४५ वर्षीय रुग्णाला छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने १०८ बाईक ॲम्ब्युलन्सला कॉल करण्यात आला. या प्रकरणात देखील रुग्णास तत्काळ प्रथमोपचार देऊन जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताच्या अनेक प्रकरणात देखील बाईक ॲम्ब्युलन्सची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.

मुंबईतल्या वेगवेगळ्या अशा १० ठिकाणी या बाईक ॲम्ब्युलन्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. १०८ या निशुल्क हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. शहरातील ज्या भागातील रुग्णावर आपत्कालीन परिस्थिती ओढवली असेल त्या भागापासून नजीकच्या बाईक ॲम्ब्युलन्सद्वारे तत्काळ आरोग्यसेवा या प्रकल्पाच्या माध्यमातून पुरविण्यात येत आहे. बाईक ॲम्ब्युलन्स ज्याठिकाणी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत त्या ठिकाणची यादी पुढीलप्रमाणे:
१. अशोक टेकडी, जमील नगर, भांडुप (प)
२. चिता कॅम्प प्रसूती गृह, मानखुर्द
३. धारावी पोलीस स्थानक
४. नागपाडा पोलीस स्थानक
५. कुरार पोलीस स्थानक, अप्पा पाडा, मालाड (पू)
६.चारकोप पोलीस स्थानक
७. गोरेगाव चित्रनगरी
८. खार धांडा पोलीस स्थानक
९. अप्पर आयुक्त पोलीस स्थानक, ठाकूर व्हिलेज
१०. मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस

Advertisement
Advertisement