Published On : Fri, Nov 15th, 2019

वीज बचतीसाठी द्या केवळ ‘एक तास’

मनपा-ग्रीन व्हिजीलचे आवाहन : पोर्णिमा दिवसानिमित्त जनजागृती

नागपूर : वीज बचत ही काळाची गरज आहे. अगदी आपल्या लहान-लहान सवयीतून आपण वीज बचत करू शकतो. अनावश्यक ठिकाणी सुरू असलेली विजेची उपकरणे बंद करणे, हा सर्वात महत्त्वाचा उपाय. याच उद्देशातून नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने ‘पोर्णिमा दिवसा’ची सुरुवात करण्यात आली. उजेड्या रात्री किमान एक तास अनावश्यक वीज दिवे आणि अन्य उपकरणे बंद करा आणि शहरातील वीज बचतीत योगदान द्या, असे आवाहन करण्यात आले.

नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. १३) पोर्णिमा दिवसानिमित्त लक्ष्मीनगर चौक येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून अविरत राबविण्यात येत आहे. प्रत्येक पोर्णिमेला मनपा कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात येते आणि शहरातील एका परिसरात जनजागृती करण्यात येते. महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात प्रकाश विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात मनपा कर्मचारी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी लक्ष्मीनगर परिसरात जनजागृती केली. प्रत्येक पौर्णिमेला रात्री ८ ते ९ या वेळेत अनावश्यक वीज दिवे बंद करा, असे आवाहन परिसरातील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना केले. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वीज दिवे बंद केले. मनपाच्या वतीनेही पथदिवे काही काळ बंद ठेवण्यात आले होते.

यावेळी मनपाच्या उपअभियंता कल्पना मेश्राम, कनिष्ठ अभियंता राजेंद्र राठोड, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव सहभागी झाले होते.