Published On : Fri, Nov 6th, 2020

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने हा पर्याय : ना.गडकरी

Advertisement

‘इलेक्ट्रिक मोबिलीटी समिट 2020’

नागपूर: वायूप्रदूषण ही एक गंभीर समस्या असून या समस्येवर मात करण्यासाठी व 40 हजार कोटींच्या क्रूड ऑईलची आयात कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने किंवा जैविक इंधनावर चालणारी वाहने हा पर्याय असून भविष्यात याकडे देशाला वळावे लागेल, असा विश्वास केंद्रीय महामार्ग, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

‘इलेक्ट्रिक मोबिलीटी समिट 2020’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले- 40 हजार कोटींच्या क्रूड ऑईलच्या आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव येतो. दिवसागणिक वाहनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता वायुप्रदूषण किती मोठ्या प्रमाणात होणार याचा विचार केला पाहिजे. केवळ वाहनांमुळे वायूप्रदूषण एवढे एकच कारण नाही. अन्य कारणेही आहेत. आज देशात इलेक्ट्रीक पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. सौर ऊर्जेचाही उपयोग केला जाऊ शकतो. तसेच इलेक्ट्रिक वाहने ही प्रदूषण मुक्त आणि परवडणारी आहेत. ऑटोमोबाईल कंपन्यांनी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत वाहनांच्या किमती कमी केल्या तर ही वाहने रस्त्यावर अधिक दिसू शकतील. चार्जिंगचे तंत्रही उपलब्ध करावे लागणार आहे. चार्जिंगचे तंत्र ही यातील महत्त्वाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

देशात दुचाकी वाहनांची वाढली आहे. निर्यातीमुळे उत्पादनाचा दर्जा चांगला राहिला आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- डिझेल पेट्रोलला पर्याय इलेक्ट्रिक किंवा जैविक इंधन म्हणून समोर आला आहे. कौशल्याधिष्ठित मनुष्य, उच्च तंत्रज्ञान, कच्चा माल उपलब्ध असल्यामुळे भविष्यात देश ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रमांक 1 चे स्थान प्राप्त करेल. सार्वजनिक वाहतुकीसाठी इथेनॉल, मिथेनॉल, बायो सीएनजी, इलेक्ट्रिक इंधन म्हणून वापर केला तरच परवडणार आहे. सध्याच्या स्थितीत सार्वजनिक बस वाहतूक तोट्यात आहे. डिझेल चोरी आणि तिकीटांमध्ये होणार्‍या गडबडी लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक जैविक इंधनावर आणणे आणि ई तिकीट सुरु करणे आवश्यक झाले आहे. दुचाकी टॅक्सी म्हणून जैविक इंधनावर सुरु झाली तर भविष्य उत्तम राहणार असल्याचे ना.गडकरी म्हणाले.

विदर्भातील ट्रॅक्टर बायो सीएनजीवर आणणार
विदर्भातील ट्रॅक्टर बायो सीएनजीवर आणण्याचा आपला प्रयत्न असून नागपुरात सार्वजनिक वाहतुकीतील 80 बस बायो सीएनजीवर आणल्या असून लवकरच 400 बसेस सीएनजीवर येतील, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- बसमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट हा प्रकार बंद करणार व ई तिकीट सुरु करणार. डिझेल आणि पेट्रोलची आयात बंदच करायची आहे. बांधकामासाठी लागणारी मशिनरीही जैविक इंधनावर ़रुपांतरित व्हावी यासाठीही आपले प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.