Published On : Tue, Dec 3rd, 2019

आकांक्षा फाऊंडेशनच्या सहकार्याने मनपातील शाळेचा दर्जा उंचावणार – महापौर

Advertisement

शिक्षण विभागाचा घेतला आढावा : नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी मनपा प्रयत्नरत आहे. आता आकांक्षा फाऊंडेशनही यासाठी पुढाकार घेणार आहे. आकांक्षा फाऊंडेशनच्या सहाकार्याने मनपाच्या शाळेतील दर्जा उंचावणार असल्याचा विश्वास महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला. त्यासोबतच प्रशासनानेही आपली जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

मंगळवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात शिक्षण विभागातील कार्यप्रणाली संदर्भात महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. यावेळी उपमहापौर मनिषा कोठे, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, उपनेत्या वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर, क्रिडा निरिक्षक नरेश चौधरी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापौरांनी मनपाच्या शाळेतील सध्यस्थिती जाणून घेतली. मनपाच्या शाळेत 7 हजार 141 उच्चमाध्यामिक वर्गातील विद्यार्थी तर 12141 हे प्राथमिक वर्गातील विद्यार्थी आहे. मनपाच्या मालकीच्या 102 इमारती तर 83 इमारती या भाडेतत्त्वावर घेतल्या असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी दिली. मनपामार्फत विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय पुस्तके, स्वेटर आपण देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनपाच्या शिक्षकांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना शालेय शिक्षणाबरोबर अन्य शैक्षणिक उपक्रमही सुरू करावे, असे महापौरांनी सांगितले. काळानुरूप परिवर्तन आवश्यक आहे, त्यानुरूप विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण कसे मिळेल याचा देखील विचार शिक्षकांनी व मुख्याधापकांनी करावा, असे सांगितले. वेळेत न येणाऱ्या व लवकर घरी जाणाऱ्या शिक्षकांना नोटीस बजावावा, त्यांच्यावर कारवाई करावी, असेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

आकांक्षा फाऊंडेशनच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली. आकांक्षा फाऊंडेशनच्यावतीने मनपाच्या शाळा अद्ययावत करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी दिली. मनपाच्या चार शाळेत आता इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे, अशी माहीती शिक्षणाधिकारी श्रीमती मिश्रीकोटकर यांनी दिली.

मनपातील गुणवंत विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना वैयक्तिगत पातळीवर ज्या विषयात तो कमजोर असेल त्याविषयात त्याला निपुण करावे, असे महापौर संदीप जोशी यांनी सूचविले. उपमहापौर व शिक्षण समिती सभापती पुढे काही दिवसात मनपाच्या शाळेंना भेट देतील, त्या भेटीत जे शिक्षक गैरहजर किंवा उशीरा आलेले दिसतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करतील असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.