Published On : Tue, Dec 3rd, 2019

मनपाच्या सर्व दवाखान्यांमध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सुविधा द्या – महापौर

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : आरोग्य विभागाची बैठक

नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून मनाचे दवाखाने अत्याधुनिक आणि अद्ययावत होत आहे. या दवाखान्यामधील आरोग्य सुविधा ही चांगली आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून मनपाचे आणखी दवाखाने अद्ययावत करून त्यातील प्राथमिक सुविधा सुधाराव्या, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. मंगळवारी (ता.3) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आरोग्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपनेत्या वर्षा ठाकरे, उपायुक्त राजेश मोहिते, उपसंचालक (आरोग्य विभाग) डॉ.भावना सोनकुसळे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.विजय जोशी, टाटा ट्रस्टचे टिकेश बिसेन यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी मनपाच्या दवाखान्यांच्या आढावा घेतला. मनपाद्वारे आयसोलेशन, सदर, गांधीनगर, महाल येथील प्रभाकरराव दटके दवाखाना यामध्ये सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. मनपा द्वारे सुरू असलेल्या 7 दवाखान्याबाबतही माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी यांनी दिली. मनपा आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा महापौरांनी घेतला. टाटा ट्रस्टद्वारे मनपाचे दवाखाने अद्ययावत करून सुरू आहे. या दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, सुविधा रूग्णांना मिळत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली. या अंतर्गत रक्त तपासणीचे केंद्रीकरण, औषधी साठा याबाबतही माहिती श्रीमती सोनकुसळे यांनी दिली.

यावेळी टाटा ट्रस्टचे टिकेश बिसेन यांनी पीपीटी द्वारे टाटा ट्रस्टच्या कार्याची माहिती महापौरांना दिली. टाटा ट्रस्टच्यावतीने मनाचे 27 दवाखाने अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून मनपाचे 50 दवाखाने कसे अद्ययावत होईल, याचा विचार करावा, असे महापौर संदीप जोशी यांनी सूचित केले. मनपाच्या सर्व वैद्यकीय अधिकारी व दवाखान्यांची यादी दोन दिवसात मला सादर करावी, असे निर्देश महापौरांनी दिले. यामध्ये शहरातील खासगी डॉक्टरची काय मदत घेतला येईल, याचा विचार देखील करावा, अशी सूचना महापौरांनी यावेळी केली. मनपाच्या दवाखान्यातील रूग्णांना पुढील उपचारासाठी जर खासगी दवाखान्यात पाठवायचे झाले तर त्याची सोय खासगी दवाखाने करण्यासंदर्भात विचार करावा, असेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.