Published On : Tue, Dec 3rd, 2019

शहरातील गरजवंतांसाठी महापौर सहायता निधी फायदेशीर ठरणार – संजय बंगाले

महापौर सहायता निधीसाठी गठीत समितीची बैठक

नागपूर: शहरातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत व गरजू खेळाडूंसाठी, वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजवंतांना महापौर सहायता निधीचा फायदा निश्चितच होईल, असा विश्वास महापौर सहायता निधी समितीचे अध्यक्ष संजय बंगाले यांनी व्यक्त केला.

महापौर संदीप जोशी यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांनी ‘महापौर सहायता निधी’ची घोषणा केली. यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले यांच्या अध्यते खाली समितीही गठीत करण्यात आली. या समितीची बैठक मंगळवारी (ता. ३) पार पडली. समितीची बैठक मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात आयोजित करण्यात आली.

बैठकीला संजय बंगाले यांच्यासह समिती सदस्य व वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी अनंत मडावी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, क्रिडाधिकारी पियुष अंबुलकर, ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे विभागीय संचालक जयंत पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.

‘महापौर सहायता निधी’ म्हणजे महापौर संदीप जोशी यांनी सुरू केलेला स्तुत्य उपक्रम आहे. माजी महापौर अटलबहादुर सिंग यांनी ही संकल्पना मांडली होती. महापौर सहायता निधीची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढविणार असल्याचे संजय बंगाले यांनी सांगितले. यासाठी घटनेचा आधार घेत कंपनी कायद्यानुसार याची नोंदणी आठ दिवसाच्या करण्याचे निर्देश दिले.


कंपनी ऍक्टमध्ये नोंदणी केल्याने जे नागरिक या महापौर सहायता निधीमध्ये निधी जमा करतील त्यांना ८० जी अंतर्गत करसवलत देता येईल का याची पडताळणी करण्याची सूचना संजय बंगाले यांनी केली. महापौर सहायता निधीअंतर्गत प्रामुख्याने राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरचे प्रतिभावंत व गरजू खेळाडू, आरोग्य विषयक उपचार घेणारे गरजू नागरिक यांना फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी व प्रधानमंत्री सहायता निधीमध्ये जे लाभार्थी समाविष्ट होत नाही, अशा गरजूंना या निधीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती संजय बंगाले यांनी दिली. महापौर सहायता निधीसंदर्भातील सर्व नियमावली सात दिवसाच्या आत तयार करून पुढील बैठकीस सादर करावी, असे संजय बंगाले यांनी सांगितले. सर्व नोंदणी व नियमावली तयार झाल्यानंतर मनपाच्या सर्वसाधारण सभेसाठी पाठविण्यात येईल असेही संजय बंगाले यांनी सांगितले.