Published On : Sat, Jul 20th, 2019

अतिसारामुळे बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस- शिंदे

Advertisement

कसारा येथून राज्यस्तरीय लसीकरणाचा आरोग्यमंत्र्यांनी केला शुभारंभ

मुंबई: अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथे आज करण्यात आला. त्यासाठी कसारा या आदिवासी भागाची निवड या राज्यस्तरीय लसीकरणासाठी करण्यात आली. राज्यातील एक वर्षापर्यंतच्या सुमारे २० लाख बालकांना दरवर्षी मोफत लस देण्यात येणार असून राज्य शासनाच्या नियमीत लसीकरणात त्याचा समावेश करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Gold Rate
05 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,35,600/-
Gold 22 KT ₹ 1,26,100 /-
Silver/Kg ₹ 2,36,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटनही आरोग्यमंत्र्यांनी केले. यावेळी पाच बालकांना आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते रोटा व्हायरस लस देण्यात आली. कार्यक्रमास आमदार पांडुरंग बरोरा, ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

रोटा व्हायरसमुळे होणाऱ्या अतिसाराचा धोका बालकांमध्ये वयाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये अधिक आढळून येतो. अतिसारामुळे दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ४० टक्के बालके ही रोटा व्हायरसने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. अतिसाराचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आज पासून महाराष्ट्रात ह्या लसीचा समावेश नियमीत लसीकरणात करण्यात आला आहे. त्यानुसार ३४ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सुमारे १ लाख ८६ हजार अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

सध्या राज्याला ४ लाख ४० हजार लसींचे डोस आणि त्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आले आहे, असे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले, ही लस खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येत होती. मात्र त्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येत असल्याने शासनाच्या आरोग्य केंद्रातून आता ही लस आजपासून मोफत दिली जाणार आहे. एक वर्षापर्यंतच्या बालकाला त्याच्या वयाच्या सहा, दहा आणि चौदाव्या आठवड्यात अशी तीनदा देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कसारा सारख्या आदिवासी भागात पूर्वी मुलांमध्ये अतिसाराचे प्रमाण अधिक होते. याच भागापासून अतिसार प्रतिबंधक रोटा व्हायरस लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला हे सकारात्मक पाऊल असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आरोग्य केंद्रांच्या इमारतींची अर्धवट कामे पूर्ण करण्याकरीता मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केले.

राज्यात आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्याची मोहिम सुरू आहे. एमबीबीएस आणि विशेषज्ञांची ८९० पदे भरण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे दुर्गम आणि आदिवासी भागात काम करणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना कायम करण्यात आले आहे. आरोग्य विभागात मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ग्रामीण भागात डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा देण्यात येत आहे. राज्यातील उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता पर्यंत ११०० आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आज आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते कसारा आणि वज्रेश्वरी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नूतन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी भागातील नागरिकांना या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून दर्जेदार सेवा मिळेल, अशी अपेक्षा आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाची असून त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आमदार बरोरा, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमास ठाणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आरोग्य सहआयुक्त डॉ. सतिश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते कसारा आरोग्य केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खर्डी येथील ग्रामीण आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी देखील आरोग्यमंत्र्यांनी केली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement