Published On : Sat, Jul 20th, 2019

अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी कडूनिंबाचा किटकनाशक म्हणून वापर करावा- डॉ बोंडे

Advertisement

मुंबई :- भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रिय कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी देखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल असे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.

मंत्रालयात अर्जेंटिनाचे कृषीउद्योग सचिव डॉ. ल्युईस ईचलव्हेअर यांच्या समवेत पाच जणांच्या शिष्टमंडळाने आज कृषिमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, भारतात रासायनिक कीटकनाशकासाठी उत्तम पर्याय म्हणून कडुनिंबाचा वापर करण्यात येतो. त्याचा अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांना फायदा होईल. आपण दोन्ही देशातील शेतीशी निगडित विविध पद्धतींचे अवलोकन करून त्यांची देवाणघेवाण केली तर त्याचा दोन्ही देशांना नक्कीच फायदा होईल.

दोन्ही देशातील हंगामी शेती उत्पादन वेगवेगळ्या कालावधीत होते. जेव्हा एखादा हंगाम संपतो त्यावेळी निर्यातीच्या माध्यमातून दोन्ही देशात दर्जेदार हंगामी फळे, अन्नधान्य, तेलबिया, बियाणे उपलब्ध होऊ शकतात. या माध्यमातून दोन्ही देशातील शेती व्यवसायास चालना मिळेल व हंगामी फळे व इतर उत्पादन वर्षभर उपलब्ध होतील, असा विश्वास अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने यावेळी व्यक्त केला. अशा शेती उत्पादनांची यादी बनवून आपण याबाबत लवकरच प्रस्ताव सादर करू व राज्यातील आंबा, केळी व डाळींब या फळांच्या निर्यातीबाबत आपण सकारात्मक असल्याचेही शिष्टमंडळाच्या सदस्यांनी सांगितले.

या भेटी दरम्यान अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने शेती उत्पादन साठविण्याच्या पद्धती, उत्कृष्ट दर्जाच्या बियाणांची उपलब्धता, सेंद्रिय कीटकनाशके व दोन्ही देशांचे हंगामी उत्पादन याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण केली. व त्यांनी कृषी व्यवसायाशी संबंधित सामंजस्य करार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत ही चर्चा केली. या माध्यमातून दोन्ही देशातील कृषी व्यवसायास चालना मिळण्यास मदत होईल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले,दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त नरेंद्र पोयाम, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त सुमंत भांगे, महानंद डेअरीचे महाव्यस्थापक एम व्ही चौधरी, महानंद डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक जी सी मंगळे, सामान्य प्रशासन विभागाचे (राजशिष्टाचार) श्रीधर देशमुख त्याचबरोबर कृषि व पदुम विभाग, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.