Published On : Tue, Jun 16th, 2020

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उद्योगांची आकस्मिक तपासणी – जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे

Advertisement

नागपूर: कोरानाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्यागांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक उद्योगांची अचानक पाहणी करणार असून कोरोना प्रतिबंध उपायाच्या अंमलबजावणीबाबत खात्री करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.

बचत भवन सभागृहात आज अधिकारी व उद्योग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर, उपाध्यक्ष शेखर पटवर्धन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे सचिव शशिकांत कोठारकर व नितीन लोणकर यावेळी उपस्थित होते.

उद्योगांच्या अचानक तपासणीचा उद्देश हा केवळ सूचनांचे पालन होते किंवा नाही यापुरता मर्यादित असणार आहे. कुठल्याही उद्योगाला त्रास देण्याचा उद्देश यामागे नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कामाच्या ठिकाणी कामगारांचे स्क्रिनिंग, उद्योगाचे निर्जंतुकीकरण, सुरक्षित अंतर तसेच कामगारांची आरोग्य तपासणी इत्यादी संदर्भात आकस्मिक भेटी दरम्यान पाहणी करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी व उद्योग क्षेत्रातील पदाधिकारी या पथकात समाविष्ट असतील. गुरुवारपासून या भेटी सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगणा एमआयडीसीमधून या भेटींना सुरुवात करण्यात येणार आहे. या पथकासाठी जिल्ह्यातील विविध विभागांनी अधिकाऱ्यांची यादी तात्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योगांनी काय काळजी घ्यावी याबाबत शासनाने मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. त्यानुसार कार्यवाही होते किंवा नाही याबाबतची तपासणी या पथकाकडून अपेक्षित आहे. उद्योग समूहाला अकारण त्रास होणार नाही याची दक्षता निश्चित घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. आपल्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारास ताप, खोकला व अन्य लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. ताप हे कोरोनाचे प्राथमिक लक्षण असून ताप असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर येवू देवू नये असे ते म्हणाले.

नागपूर जिल्ह्यात घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था आहे. नागपूरमध्ये एका दिवशी 1750 नमुने तपासण्याची सोय आहे. उद्योग समूहाने शिफारस केल्यास उपरोक्त लक्षण आढळणाऱ्या सर्व कामगारांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्याची व्यवस्था केली जाईल. कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर पाळणे अनिवार्य असून कामाच्या व जेवनाच्या टेबलवर जास्त कर्मचार असणार नाहीत. याची दक्षता उद्योगाने घ्यावी. आपल्या कारखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगाराची व अभ्यागतांची संपूर्ण माहिती उद्योगाने ठेवावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी या माहितीचा उपयोग होईल, असे ते म्हणाले. उद्योगांनी प्रशासनास सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन व उद्योग क्षेत्र समन्वयाने काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासठी उद्योग क्षेत्रे प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करणार असून शासनाच्या निर्देशानुसार कारखान्यात आरोग्यविषयक सर्व दक्षता घेण्यात येत आहे. याशिवाय शासनाने ठरवून दिलेले मार्गदर्शक तत्वे प्रशसासनाने द्यावेत. त्यानुसार कार्यवाही केली जाईल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी सांगितले.