Published On : Fri, May 6th, 2022

पेट्रोल-डिझेलची आयात नियंत्रणात आणण्यासाठी

Advertisement

जैविक इंधन-फ्लेक्स इंजिनच्या वापरास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे : ना. गडकरी

नागपूर: पेट्रोल डिझेलची 10 लाख कोटी रुपयांच्या आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी वाहनांमध्ये इथेनॉल-मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजी, ग्रीन हायड्रोजन या जैविक इंधनाचा वापर वाहनांमध्ये वाढावा. तसेच वाहनांमध्ये फ्लेस इंजिन वापरास प्रोत्साहन देणे आगामी काळात देशासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘स्टार्ट अप ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क’चे पुण्यात उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. देशात तरुणांची संख्या खूप मोठी आहे. तसेच युवक कल्पक दृष्टिकोन ठेवून काम करणारे आहेत, त्यांना नवीन तंत्रज्ञान व संशोधनासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. देशात आज 12 लाखांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने आहेत. डिसेंबरपर्यंत ही संख्या 40 लाख होईल आणि दोन वर्षात 3 कोटींपर्यंत ही संख्या जाण्याची शक्यता व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- ऑटोमोबाईल उद्योग हा सर्वात मोठा उद्योग आहे. आज 50 टक्के दुचाकी वाहनांची निर्यात केली जाते. कोणतेही नवीन तंत्रज्ञान हे देशासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि सक्षम असले पाहिजे. आज 50 लाख कोटींची उलाढाल असलेला हा उद्योग आहे. 4 कोटी रोजगार या उद्योगाने निर्माण केले आहेत.

पेट्रोल डिझेलचे भाव व होणारे प्रदूषण पाहता इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजी, एलएनजी, ग्रीन हायड्रोजन या जैविक इंधनाचा वापर वाढणार असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- इलेक्ट्रिकलाही खूप वाव आहे. सध्या लिथियम ऑयन बॅटरी, झिंक ऑयन बॅटरी यावर काम सुरु आहे.

संशोधन हे आपापल्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार व्हावे. ज्या वस्तू आपण आयात करतो, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यायी वस्तू निर्माण करून आयातीवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. नवीन संशोधन करताना गरजेनुसार कोणते तंत्रज्ञान आवश्यक आहे, याचा अभ्यासही करावा लागणार. तसेच त्यात येणार्‍या अडचणीही दूर कराव्या लागतील, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.