Published On : Fri, May 6th, 2022

मालवाहतुकीवरील खर्च 8 टक्क्यांपर्यंत आणणे गरजेचे : ना. गडकरी

Advertisement

नॅशनल सागरमाला अ‍ॅपेक्स कमिटीची बैठक

नागपूर: देशात 90 टक्के मालवाहतूक ही रस्त्यांवरून होते. मालवाहतुकीसाठी जलमार्गाचा अधिक वापर व्हावा. अन्य देशांमध्ये मालवाहतुकीवर 8 टक्केपर्यंत खर्च केला जातो. भारतात मात्र मालवाहतुकीसाठी 14 टक्के खर्च होतो. या खर्चात कपात करून तो 8 टक्केपर्यंत आणल्यास देशाच्या विकासासाठी अधिक मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

या आभासी कार्यक्रमाला केंद्रीय जहाजमंत्री सर्बानंद सोनोवाल, शिक्षणमंत्री धर्मंद्र प्रधान, ना. किशन रेड्डी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व अन्य राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते. नॅशनल सागरमाला अ‍ॅपेक्स कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतमाला व सागरमाला या दोन योजनांचे उद्घाटन झाले होते. भारतमाला अंतर्गत आम्ही महामार्गांचे बांधकाम करीत आहोत, तर सागरमाला योजनेअंतर्गत जलमार्ग विकसित केले जात आहे. 12 लाख कोटी रुपयांचा कार्यक्रम सागरमाला योजनेत आम्ही तयार केला होता.

यापैकी 8 लाख कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते वाहतुकीने मालाची वाहतूक ही अत्यंत खर्चिक आहे. जलमार्गाच्या विकासाकडे सर्वच राज्यांनी लक्ष दिले तर देशाचे मोठे काम होईल. आज बांगला देशात निर्यातीसाठी रस्ते मार्गांनी वाहतूक जाम आहे. माल पोहोचण्यासाठी महिने लागत आहे. याउलट जलमार्गाने मात्र दोन दिवसात माल पोहोचविणे शक्य आहे. जलमार्ग वाहतुकीने लोकांचा मोठा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले.

मोठ्या नद्यांमधून 18 सीटर विमानाची वाहतूक सुरु व्हावी यासाठीही आपण प्रयत्न केले असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- या वाहतुकीने पर्यटनालाही चालना मिळेल. तसेच मुंबई, कोचीन, चेन्नई, बंगलोर अशा समुद्रालगतच्या शहरांमधून क्रूझ वाहतूक सुरु व्हावी. अन्य देशात 15 टक्के वाहतूक ही जलमार्गाने होते, तर आपल्या देशात फक्त 2 टक्के वाहतूक जलमार्गाने होते. तसेच जहाजांमध्ये इथेनॉलचा वापर झाला तर प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.