Published On : Sat, Oct 14th, 2017

अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक.-न्या. कुणाल जाधव

नागपूर: सुरक्षित वाहतुकीसाठी तसेच अपघात टाळण्यासाठी वाहन चालवतांना काळजी घेणे व वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश कुणाल जाधव यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आत्मदिप सोसायटी, ग्राहक न्याय परिषद व जनआक्रोश सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिताबर्डी ते रहाटे कॉलनी दरम्यान जागतिक पांढरी काठी दिवसानिमित्त वाहतुक सुरक्षा नियम जनजागृती रॅलीचे उद्घाटन न्या. कुणाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य ॲङ राजेंद्र राठी, पोलीस निरीक्षक जयश भांडारकर, आत्मदीप सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती जिज्ञासा कुबडे, ग्राहक न्याय परीषदेचे अमित हेडा, श्रीमती प्रिती सावरकर, श्रीमती सविता रेलकर व जनआक्रोश सामाजिक संस्थेचे डॉ.अनिल लध्धड उपस्थित होते.
वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अपघात होऊन मोठया प्रमाणात शारीरिक इजा होऊ शकते. त्यामुळे आयुष्य उध्वस्त होते. सोबतच कुटूंबाची अपरिमित हानी होते. शारीरिक, मानसिक तसेच कौटूंबिक त्रास टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे हितावह आहे. असे सांगून, सुरक्षित प्रवास करण्यासाठी दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन न्या. जाधव यांनी यावेळी केले.

सर्वसामान्य व्यक्तींनी अंध व्यक्तींना मदत करतांना, ‘आपण त्यांच्यावर उपकार करीत आहोत.’अशी जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही याविषयी आवश्यक काळजी घ्यावी. तसेच सामान्य व्यक्तीप्रमाणे अंध व्यक्तींना जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करावे. असे श्रीमती जिज्ञासा कुबडे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देताना ॲङ राजेंद्र राठी यांनी नागरीकांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे कायदेविषयक आवश्यक ती सर्व मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

‘आमच्या साठी पांढरी काठी तर तुमच्या साठी हेल्मेट’, ‘तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी हेल्मेट आणि पांढरी काठी,’ ‘पांढरी काठी सुरक्षा हेल्मेट सुरक्षा’ अशा घोषणांनी रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी व स्वयंसेवक, अंध विद्यालयाचे अंध विद्यार्थी, इतर शासकीय व अशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.