Published On : Sat, Oct 14th, 2017

अॅड.महादेवराव शेलार यांच्या निधनामुळे विचारधारेशी बांधिलकी असलेले संवेदनशील नेतृत्व हरपले!: विखे पाटील

मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. महादेवराव शेलार यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक असून, त्यांच्या रुपात विचारधारेशी बांधिलकी असलेले एक संवेदनशील नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

अॅड. शेलार यांच्या अकस्मात निधनानंतर दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, ते कायम हसतमुख, मनमिळावू आणि सहकार्यासाठी तत्पर असायचे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस असताना जनता दरबारच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षातील मंत्री व नागरिकांमधील एक दुवा म्हणून त्यांनी उत्तम काम केले.

सतत कार्यमग्न राहणाऱ्या अॅड. महादेवराव शेलार यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून, मी एक व्यक्तिगत मित्र गमावला आहे, या शब्दात दुःख व्यक्त करून विरोधी पक्षनेत्यांनी अॅड. महादेवराव शेलार यांना श्रद्धांजली अर्पण केली.