Published On : Sat, Oct 14th, 2017

शासकीय व लष्करी इतमामात शहीद प्रवीण येलकर यांना साश्रुपूर्ण नयनांनी निरोप

कोल्हापूर: ‘जब तक सुरज चाँद रहेगा, प्रवीण येलकर तुम्हारा नाम रहेगा’, ‘अमर रहे… अमर रहे, शहीद जवान प्रवीण येलकर अमर रहे.‘भारत माता की जय’, ‘वीर जवान तुझे सलाम’, ‘वंदे मातरम्’ अशा आसमंत दणाणून टाकणाऱ्या घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी शहीद जवान प्रवीण येलकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील श्री. भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानावर शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान प्रवीण येलकर यांच्या पार्थिवास त्यांचे बंधू राजेंद्र यांनी मुखाग्नी दिला. यावेळी पत्नी पूनम येलकर, चार वर्षाची मुलगी प्रांजल, वडील तानाजी येलकर, आई शालन येलकर यांच्यासह उपस्थित प्रत्येकच जण गहिवरुन गेला.

शासनाच्यावतीने शहीद प्रवीण येलकर यांच्या पार्थिवास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. आमदार हसन मुश्रीफ, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह इतर अधिकारी आणि मान्यवरांनी शहीद प्रवीण येलकर यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदराजंली वाहिली.

शहीद प्रवीण येलकर यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव आज सकाळी बहिरेवाडी येथे आणण्यात आले. यानंतर गावातून त्यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. पंचक्रोशीत प्रवीण येलकर अमर रहे.. वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांचे बॅनर्स लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा महिला, आबालवृध्द, तरूण मुले, मुली, शाळेची मुले, शहीद प्रवीण येलकर अमर रहे च्या घोषणा देत होते. यावेळी लष्करी व पोलीस दलातील जवानांनी शहीद प्रवीण येलकर यांना बंदुकीच्या तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना दिली.