Published On : Sat, Apr 7th, 2018

नागपुरात अनियंत्रीत टिप्परची स्कूल व्हॅनला धडक , ९ जखमी

Advertisement


नागपूर: बेसा मानेवाडा मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात अनियंत्रीत टिप्परने स्कूल व्हॅनला धडक दिल्याने विद्यार्थ्यांसह ९ जणांना जबर दुखापत झाली. यातील प्रणव वाघ नामक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने आरोपी टिप्परचालकाला खाली खेचून बेदम मारहाण केली. वेळीच पोलीस पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही शाळा आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ७. ३० च्या सुमारास स्कूल व्हॅनचे चालक विद्यार्थ्यांना घेऊन आले होते. विद्यार्थ्यांना सोडून ते परत जात होते. तर, काही व्हॅनचालकांनी शाळेच्या आवारातील पार्किगमध्ये स्कूल बस, व्हॅन लावल्या होत्या. अचानक एक पांढ-या-निळळ्या रंगाचा टिप्पर वेगात व्हॅनवर येऊन धडकला. त्यावेळी या व्हॅनमधील विद्यार्थी उतरून शाळेच्या आत जात होेते. त्यामुळे ८ विद्यार्थ्यांना दुखापत झाली. दरम्यान, ज्या वेळी हा अपघात झाला त्या वेळी अनेक पालक आपापल्या पाल्यांना घेऊन शाळेत आले होते. काही मॉर्निंग वॉक करणारे तर काही रस्त्याने जाणारे-येणारे होते. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. परिणामी अनेकांनी तेथे धाव घेतली. टिप्पर चालकाच्या हलगर्जीपणे हा अपघात झाल्याचे लक्षात आल्याने संतप्त जमावाने त्याला खाली खेचला आणि बेदम चोप दिला. चालकाला कपडे फाटेपर्यंत आणि रक्तबंबाळ होईपर्यंत जमावाने मारहाण केली. त्यामुळे तो देखिल जखमी झाला. अपघातामुळे शाळेच्या आवारात मोठा तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलिसांचा ताफा पोहचला. पोलिसांनी जमवाची कशी-बशी समजूत काढून आरोपी टिप्परचालकाला ताब्यात घेतले. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या खासगी ईस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर लगेच उपचार करण्यात आले. त्यातील प्रणव वाघ याच्या कानाला जबर दुखापत असल्याने पालकांनी त्याला सक्करद-याच्या एका खासगी ईस्पितळात नेण्यात आले. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी टिप्परचालकाला अटक केली.


अन्य वाहनांचीही मोडतोड
टिप्पर एवढ्या वेगात होता की, पहिल्या व्हॅनला अपघात दिल्यानंतरही त्याचा वेग कमी झाला नाही. तशाच अवस्थेत या टिप्परची अन्य तीन चार वाहनांना धडक बसली. त्यामुळे त्या वाहनांचीही मोडतोड झाली. सुदैवाने या वेळी त्या वाहनांमध्ये कुणी विद्यार्थी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Gold Rate
Tuesday 25 March 2025
Gold 24 KT 87,900 /-
Gold 22 KT 81,700 /-
Silver / Kg 98,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पालकमंत्र्यांची भेट
या अपघाताची माहिती कळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे घटनास्थळी पोहचले. त्यांनी स्कूल प्रशासनाकडून अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची विचारपूस केली. डॉक्टरांनाही आवश्यक त्या सूचना केल्या.

Advertisement
Advertisement