Published On : Fri, May 14th, 2021

मनपाच्या रुग्णालयात आजपर्यंत २९६५ कोव्हिड रुग्णांवर उपचार

Advertisement

२०३४ रुग्ण बरे होऊन परतले : ३९६ कर्मचारी देत आहेत अन्य रुग्णालयांत सेवा

नागपूर : शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी पुरविणाऱ्या महानगरपालिकेने कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा बळकट केली. अस्तित्वात असलेल्या दवाखान्यांचा कायापालट करीत ऑक्सिजनयुक्त बेड्सची संख्याही वाढविली. वर्षभरात या दवाखान्यात २९६५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून २०३४ रुग्ण पूर्णतः बरे होऊन घरी परतले आहेत. महानगरपालिकेच्या डॉक्टर व नर्स यांनी निस्वार्थ भावनेने काम करुन या महामारीच्या संकट काळात नागरिकांना मोठा आधार दिला आहे. वा रुग्णालयात नि:शुल्क उपचार तर केले तसेच त्यांच्या जेवणाची, नाश्ता, चहाची व्यवस्था सुध्दा मनपाच्या वतीने करण्यात आली. महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी आरोग्य यंत्रणेचे यासाठी अभिनंदन केले आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाच्या विविध रुग्णालयात सद्यस्थितीत २२३ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी २२१ नागपूरचे तर दोन रुग्ण बाहेरगावचे आहेत. सध्या मनपाद्वारे आठ रुग्णालय संचालित करण्यात येतात. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात कोव्हिड रुग्णांसाठी एकूण ९६ बेड्स असून त्यापैकी ९० ऑक्सिजनयुक्त आहेत तर सहा सामान्य आहेत. येथे आतापर्यंत १४४८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. सध्या ७१ रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत ९८८ रुग्ण पूर्णतः बरे होऊन घरी परतले. इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये एकूण ३२ बेड्सची व्यवस्था असून संपूर्ण बेड्स ऑक्सिजनयुक्त आहेत. आजपर्यंत या रुग्णालयात २९४ रुग्णांवर उपचार झाले असून २२७ जणांना सुटी देण्यात आली आहे. सध्या २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सदर येथील आयुष्य हॉस्पिटलमध्ये 42 बेड्स असून सर्व ऑक्सिजनयुक्त आहेत. आजपर्यंत या रुग्णालयात २६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी १९६ रुग्ण पूर्णतः बरे झाले. सध्या १५ जणांवर तेथे उपचार सुरू आहेत. पाचपावली येथे मनपाने समर्पित कोव्हिड हेल्थ सेंटर उभारले. त्यात ऑक्सिजनयुक्त ६८ बेड्सची व्यवस्था करण्यात आली. आजपर्यंत येथे ५९८ रुग्णांवर उपचार झाले असून सध्या ५६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी के.टी. नगर हॉस्पिटल सुरू करण्यात आले. येथे ऑक्सिजनयुक्त २६ बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. आजपर्यंत ५६ कोव्हिड रुग्ण येथे दाखल करण्यात आले असून सध्या २१ रुग्णांवर उपचार सुरु आहे.२९ रुग्ण पूर्णतः बरे होऊन घरी परतले, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.

रेल्वेच्या सहकार्याने कोव्हिड रुग्णालय, कंटेनर डेपो, नरेन्द्रनगर येथे सुरू करण्यात आले. येथे ४७ ऑक्सिजनयुक्त तर २२ आय.सी.यू. बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. २३९ रुग्ण आजपर्यंत येथे दाखल करण्यात आले. त्यातील १७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून १३९ रुग्ण कोव्हिडमुक्त होऊन परतले.

क्रीडा चौकातील श्री आयुर्वेदिक (पक्वासा) रुग्णालय मनपाच्या मदतीने सुरू करण्यात आले. येथे ४० बेड्सची व्यवस्था आहे. ६९ रुग्ण आजपर्यंत दाखल झाले असून सद्यस्थितीत २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २७ रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत. पाचपावली स्त्री रुग्णालयात ११० ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत असून लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होईल.

शासकीय रुग्णालयात मनपाच्या ३९६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवा

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढला होता. मेडिकल आणि मेयो येथे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली. मनपाने या रुग्णालयांना मनुष्यबळ पुरविले. पाच फिजिशियन, दोन भूलतज्ञ, ४५ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, ४६ आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, १५१ परिचारिका, आठ फार्मासिस्ट, १९ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १५ डेटा ऑपरेटर, १७ क्ष-किरण तज्ञ, नऊ प्राणवायू तंत्रज्ञ, तीन ईसीजी तंत्रज्ञ, १२ डायलिसिस तंत्रज्ञ, तीन भांडार अधिकारी, ६१ वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकूण १४२, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) एकूण १७६ तर शालिनीताई मेघे रुग्णालयात एकूण ७८ मनपाचे मनुष्यबळ कर्तव्यावर आहेत.

Advertisement
Advertisement