
नागपूर : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून, मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, या प्रकरणातील आरोपींसह त्यांच्यामागे असलेल्या व्यक्तींनाही शोधून काढले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री म्हणाले की, अशा प्रकारच्या घटनांना महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. संबंधित आरोपी महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेरून कार्यरत असण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांशी संपर्क साधण्यात येईल. त्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कारवाई करतील.
मुंबई पोलीस व्यावसायिक आणि सक्षम असून, यापूर्वीही अशा प्रकरणांमध्ये आरोपींसह त्यांना पाठबळ देणाऱ्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचाही लवकरच उलगडा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राणा सूर्यवंशी यांना सुरक्षा पुरवण्यात आली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कारणास्तव त्यांनी सुरक्षा घेतली नव्हती आणि त्यांच्यासोबत सुरक्षा कवच नसताना हा हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील संपूर्ण माहिती तपासातून समोर येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, टायगर श्रॉफ यांच्याशी आपले बोलणे झाले असून, त्यांना काळजी करू नये, असे आश्वासन दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. संबंधितांना शोधून काढून टायगर श्रॉफ यांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मागील सरकारच्या काळातील उद्योगपतीच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याचे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि कथित बदली-नियुक्ती घोटाळ्यांचा उल्लेख केला. या सर्व प्रकरणांचा संदर्भ देत त्यांनी मुंबई पोलीस या गोळीबार प्रकरणाचाही पर्दाफाश करतील, असा विश्वास व्यक्त केला.



