नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी अभय योजनेत आपले थकीत पाणीबिल न भरलेल्या पाणीकर थकबाकीदारांविरोधात नळजोडण्या डिस्कनेक्ट करण्याच्या कडक कारवाईला सुरुवात केली आहे. तसेच ज्यांची नळजोडणी डिस्कनेक्ट करण्यात आलेली होती व ज्यांनी बेकायदेशीरपणे ती पुन्हा जोडून घेतली अशा ३ थकबाकीदारांविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
मनपा-OCW ने इमामवाडा पोलीस स्टेशन (धंतोली झोन), जरीपटका पोलीस स्टेशन (आशी नगर झोन) व मानकापूर पोलीस स्टेशन (मंगळवारी झोन) येथे ३ (प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये १) तक्रारी नोंदवल्या आहेत.
पैकी धंतोली व मंगळवारी झोनमधील थकबाकीदारांनी आपली थकबाकी भरून तसेच मनपा-OCWला लिखित क्षमायाचना केल्यानंतर त्यांच्याविरोधातील तक्रारी त्या त्या झोनच्या मनपा डेलिगेटने मागे घेतल्या आहेत.
येथे उल्लेखनीय आहे कि, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान पाणीकर अभय योजना राबविली. यादरम्यान आपली थकबाकी पूर्ण भरणाऱ्यांना विलंब शुल्क माफ करण्यात आले होते.
मात्र थकबाकीदारांनी या योजनेला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. अशा थकबाकीदारांविरुद्ध आता पोलिसात तक्रार, ई. कडक कारवाई सुरु केली आहे.
१ सप्टेंबर पर्यंत, जवळजवळ १७६६ नळजोडण्या डिस्कनेक्ट करण्यात आल्या आहेत. पैकी ४२६ थकबाकीदारांनी आपली थकबाकीची पूर्ण रक्कम भरल्यानंतर (रु.८२.७८लाख) त्यांच्या नळजोडण्या पुन्हा जोडण्यात आल्या.
आता, मनपा-OCWने प्रत्येक झोनमध्ये कारवाईसाठी स्वतंत्र चमू स्थापित केल्या आहेत. ज्यांच्या नळजोडण्या डिस्कनेक्ट करण्यात आल्या होत्या तरीही त्यांनी थकीत रक्कम भरली नाही अशांच्या विरोधात आता पोलीस तक्रारी करण्यात येत आहेत.
अभय योजना दि. १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात आलेल्या अभय योजनेचा लाभ घेत २७,१५५ थकबाकीदारांनी रु.१३.६१ कोटी इतकी थकबाकी भरली.