नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी व धापेवाडा मंडळातील अनेक गावांवर २६ सप्टेंबर रोजी वादळी वारे व मुसळधार पावसाने हल्ला चढवला. या नैसर्गिक आपत्तीमुळे तिडंगी, तिष्टी (खु), तिष्टी (बु), तेलगाव, दाढेरा आणि मांडवी गावातील शेतजमिनी व संत्र्यांच्या बागांवर मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
प्राथमिक माहितीप्रमाणे तब्बल ३४१० हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाकडून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू आहे.
दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी सकाळी प्रत्यक्ष दौऱ्यावर येणार आहेत. प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खात्री तालुका प्रशासनाने दिली आहे.