Published On : Mon, Oct 25th, 2021

विचार वेगवेगळे असतील पण आमचा राष्ट्रधर्म एकच आहे : ना. गडकरी

Advertisement

राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद

नागपूर: आमची संस्कृती कोणत्या धर्माशी जोडली नाही. भारतीय संस्कृती खर्‍या अर्थाने नैसर्गिक व सर्वधर्मसमभावाची आहे. म्हणूनच सर्व विचार, धर्म, सर्व देवांचा सन्मान करणे हाच आमचा जीवनदृष्टिकोन आहे. अशा सर्व चांगल्या गोष्टी एकत्र येऊन मानवधर्म झाला. भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या विचारधारा आहेत. त्यांची विशेषत: म्हणजेच ‘अनेकता मे एकता’ ही आहे. विचार वेगवेगळे असले तर आमचा राष्ट्रधर्म एकच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या समारंभाला व्यासपीठावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेता श्री श्री रविशंकर, पतंजली योगपीठचे संस्थापक स्वामी रामदेव, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनि, बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे ब्रह्म विहारीदास स्वामी, आर्चबिशप मुंबईचे कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियस, जीवनविद्या मिशन मुंबईचे प्रल्हाद वामनराव पै, महाबोधी आंतरराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भ़ि़क्खु संघसेना, गद्द नशीन दरगाह अजमेर शरीपचे हाजी सैयद सलमान चिश्ती, महापौर दयाशंकर तिवारी, लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी पुढे म्हणाले- धर्माची विशेषत: मूल्यांसोबत जोडली गेली आहे. आमच्या संतांनी, महंतांनी, धर्माचार्यांनी अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले, ते कुठे ना कुठे मूल्यांशी जोडले गेले आहे. ज्यांच्या मार्गदर्शनावर आमची वाटचाल होते, ते मूल्याधिष्ठित जीवनपध्दतीच्या आधारावर आपल्या विचारातून ते जीवनाचा दृष्टिकोन देतात. वसुधैव कुटुंबकम् हीच गोष्ट सर्व संतांनी सांगितली आहे, असेही ते म्हणाले.

विश्व कल्याणाची कल्पना करताना समाजातील गरीब, शेतकरी, यांचेही कल्याण होऊन भय, भूक, आतंक यापासून हा समाज मुक्त होऊन समाज आणि राष्ट्र सुखी, संपन्न व शक्तिशाली बनावे, हे काम शासनाचे आहे. आपल्या उपासना पध्दती, संप्रदाय वेगवेगळे असू शकतात. पण या सर्वात जे साम्य आहे, ते समजून घेऊन जीवनात त्यानुसार अनुकरण केले पाहिजे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- भारतीय संस्कृती ही धार्मिक, सांप्रदायिक नाही. ही इतिहास, संस्कृती व परंपरांपासून मिळालेल्या सर्व संप्रदाय व धर्माची जी मूल्ये आहेत, त्या आधारावर आमची पारिवारिक जीवनपध्दती आहे. याच संस्कारातून आम्ही भविष्यातील पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी हे आवश्यक आहे. हा कार्यक्रम म्हणजे पवित्र विचारांचा संगम आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.