Published On : Mon, Mar 2nd, 2020

हे सरकार पाच वर्ष १०० टक्के टिकेल – शरद पवार

Advertisement

दिल्ली दंगलीप्रकरणी शरद पवारांचा भाजपावर निशाणा,राष्ट्रवादीचे मिशन नक्की यशस्वी होणार – सुनिल तटकरे ,मुंबईतून भाजपाला संपवण्याची सुरुवात आजपासूनच – नवाब मलिक

मुंबई – लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल यादृष्टीने महाविकास आघाडी काम करत आहे. हे सरकार पाच वर्षे काढेल की नाही याची चर्चा विरोधकांनी केली आहे परंतु हे सरकार पाच वर्ष १०० टक्के टिकेल असा विश्वास शरद पवार यांनी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात व्यक्त केला.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकदिवसीय शिबीर मोठ्या उत्साहात आज पार पडले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली दंगलीप्रकरणी पंतप्रधान यांची वक्तव्ये आणि गृहमंत्री हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असमर्थ ठरल्याचा आरोप केला.

जी शक्ती देशाच्या ऐक्याला धक्का देण्यासाठी सरसावत आहे तिला दुर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असेही शरद पवार म्हणाले.

दिल्ली शहर अनेक भाषिकांचे आहे. महत्वाचे राजधानी शहर आहे. दिल्लीच्या निर्मितीपासूनच भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळण्याची चिन्ह नव्हती सत्ता मिळण्याची चिन्ह दिसत नाही. त्यावेळी सांप्रदायिक पद्धतीचा आधार घेऊन जातीय सलोखा बिघडवण्याचे काम झाले आहे असा थेट आरोपही शरद पवार यांनी केला.

पंतप्रधान, गृहमंत्री यांचा निवडणूकीत प्रचाराचा रोख पाहिला तर धार्मिक तेढ निर्माण करणारा होता. पंतप्रधान यांचे भाषण ऐकले तर लक्षात येते. देशाचं नेतृत्व करणारी व्यक्तीच धार्मिक वितंडवाद वाढवण्याचे बोलतात हे चिंताजनक आहे असेही शरद पवार म्हणाले.

मिळालेली सत्ता जनतेसाठी वापरण्याऐवजी गोळी मारण्याची भाषा करतात हे भाजपाचे नेते करताना दिसले. दिल्लीच्या शाळेवरही हल्ला केला गेला. शैक्षणिक वस्तू उध्वस्त केल्या गेल्या. शैक्षणिक संस्थेतसुद्दा हल्ला करण्यासाठी भक्तांच्या मदतीने पावले टाकली जात आहेत याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.

राष्ट्रपती दिल्लीत येतात आणि त्याच राज्यात दंगली होतात आणि देशाच्या भल्याची वक्तव्य केली जातात असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

सांस्कृतिक राजधानी उध्वस्त करण्याचे काम करणाऱ्या शक्तीला या निवडणुकीत बाजुला करण्याचे काम झाले आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आले पाहिजे. ऐक्याचे चित्र त्यांना बघवत नाहीय. समाजासमाजात आग लावण्याचे काम होत आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

आजचे राज्यकर्ते धर्म… जातीचा आधार घेऊन फुट पाडण्याचे काम करत असतील तर दुहेरी शक्ती पुढे सरसावत असतात. त्यामुळे ही जातीय शक्ती घालवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अग्रभागी असेल असे शरद पवार यांनी सांगितले.

देशात सांप्रदायिक विचार रुजवले जात आहे. दिल्लीची अधिकाराची सीमा कमी आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचा अधिकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जसे आहेत तसे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना नाही. ती सगळी जबाबदारी गृहमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे ही जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही असा आरोप शरद पवार यांनी केला.

उद्योग अडचणीत आहेत बेरोजगारी वाढली आहे असे चित्र आज देशात आहे. भविष्याची चिंता यांना नाही. ज्या पक्षाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्या पक्षाचे सरकार काही राज्यात राहिले नाही. महाराष्ट्रात सरकार आले नाही. देशाच्या हिताचा मक्ता चुकीच्या लोकांच्या हातात दिला ही भावना आता लोकांमध्ये निर्माण झाली आहे असेही शरद पवार म्हणाले.

जिथे अन्याय अत्याचाराची भिंत उभी करुन जातीयवाद… दंगलीवाद निर्माण करणारी शक्ती आहे तिला खड्यासारखे बाजुला करायचे आहे असे आवाहन शरद पवार यांनी केले.

पहिल्या दिवसापासून भाजपाची निती आपल्या सहकाऱ्यांना बाजुला करण्याची होती याची जाण शिवसेनेला आली. बाळासाहेब ठाकरे यांनी एकवेळ गांधींना पाठिंबा देवू अशी भूमिका घेतली होती याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली.

तुमच्या सर्वांच्या सामर्थ्यावर पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे काम केले. सत्ता प्रस्थापित करता आली. पक्ष कसा मजबुत करता येईल. देशात भ्रष्टाचाराने निर्माण झालेली जी व्यवस्था आहे ती होणार नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

मुंबई शहरात अजून काम करण्याची गरज आहे. नव्या लोकांना संधी दिली गेली नाही असे सांगितले जाते. म्हणून सांगू इच्छितो की, शिबीर घेतले ठिक आहे परंतु मजबुत संघटना बांधली पाहिजे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते… त्यामुळे नव्यांना संधी दिली पाहिजे. तो कार्यक्रम असला पाहिजे. नवाब मलिक हे चांगले काम करतील. शक्तीशाली पक्ष कुठे असेल तर मुंबईत असे काम करा असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

*राष्ट्रवादीचे मिशन नक्की यशस्वी होणार – सुनिल तटकरे*

मुंबईत बर्‍याच वर्षांनी पाच हजार कार्यकर्त्याचे शिबीर घेतले जाते आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे हे मिशन नक्की यशस्वी होईल असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

२३ वर्षापुर्वी राष्ट्रवादीची स्थापना मुंबईच्या शिवाजी पार्कवर झाली. मनपा निवडणुकीत इतर पक्षांसोबत आघाडी करुन लढलो आहोत. बर्‍याच वर्षानंतर राष्ट्रवादी मुंबईत शक्ती दाखवण्यात नवाब मलिक यांना यश आले आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

पवारसाहेबांनी पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली. पक्षालाच नव्हे तर देशातील अनेक पक्षांना दिशा देण्याचे काम केले आहे. तुम्हा – आम्हाला पवारसाहेबांसारखे नेतृत्व लाभले आहे. कसोटी दाखवणारे क्षण गेल्या पाच वर्षात आपण अनुभवले आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले.

पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम करताना मुंबईतही पक्ष वाढेल असे काम केले. तसे काम मुंबई महानगरात पवारसाहेबांचे विचार रुजवण्याचे काम नवाब मलिक करत आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आजची हीच शक्ती भविष्यात दाखवाल आणिमहानगरपालिकेत यश मिळवाल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

*मुंबईतून भाजपाला संपवण्याची सुरुवात आजपासूनच – नवाब मलिक*

मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपाला मुंबईतून संपवण्याची तयारी आजपासून सुरू झाली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मिशन २०२२ मुंबई महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले.

मिशन २०२२ आजपासून सुरू करतोय. आगामी दोन वर्षांत २२७ वॉर्डमध्ये संघटनेला ताकदीने उभं करण्याची माझी जबाबदारी आहे. २० वर्ष जबाबदारी होते ते पक्ष सोडून गेले. पक्ष निष्ठा ठेवून काम केलात व पक्ष जिवंत ठेवलात त्याबद्दल सर्वांना नवाब मलिक यांनी धन्यवाद दिले.

गेली २० वर्ष १४ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले नाहीत. दोन वर्ष शिल्लक असताना का सुरुवात केली तर नीट ठरवून नियोजन केले तर दादांनी सांगितले त्याप्रमाणे ५० पेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेत जिंकता येतील असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

या महिन्यात दोन वर्षाचे कार्यक्रम ठरवले आहे. त्यामुळे येत्या १० जूनला पक्षाचा वर्धापन दिन आम्ही साजरा करु असे नवाब मलिक यांनी जाहीर केले.

कार्यकर्ते स्वतः च्या खिशातील पैसे खर्च करून या शिबिराला जमले आहेत. मुंबई ही बहुवासीय नगरी आहे. श्रीमंत आणि गरीबही रहातो. त्याचा बॅलन्स करायचा आहे. टोलेजंग इमारतीत राहणाऱ्या लोकांनी गरीबांशी वाद करु नका. नाहीतर तुमच्या घरची भांडी घासायला कोण मिळणार नाही. झोपडीत राहणारा माझा गरीब माणूस आहे. श्रीमंत आणि गरीब असा वाद होता कामा नये असेही नवाब मलिक म्हणाले.

सर्वांना घरे देण्याची पॉलिसी तयार करण्याचे धोरण राबवले जाईल असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.

फेरीवाल्यांचा, सुरक्षा रक्षक, यांचेही मोठे प्रश्न आहेत. यांची पिळवणूक होत आहे ही पिळवणूक करण्याचे काम भाजपाचे लोक आहेत. अशांना जेलमध्ये टाकल्या‌शिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी यावेळी दिला.

बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. बजेट झाल्यानंतर इतर राज्यात कुठली योजना नसेल अशी योजना कौशल्य विकास मार्फत करणार असल्याची घोषणा नवाब मलिक यांनी यावेळी केली.

पाच वर्ष एकनिष्ठ राहिले आहेत त्यांना न्याय देण्याचे पवारसाहेबांचे आदेश आहेत. त्यांनाच न्याय दिला जाईल. आयाराम गयारामांना संधी दिली जाणार नाही असे आश्वासन नवाब मलिक यांनी दिले.

दुपारच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन, अमेय तिरोडकर यांचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभले. त्यानंतर खासदार सुनिल तटकरे आणि आमदार किरण पावसकर, मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मार्गदर्शन केले.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आज सोमय्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले. जवळ जवळ ५ हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची नोंदणी करून शिबीर घेण्यात आले.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.