मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत आज (१३ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले.
यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही नैतिकता आणि सत्याची लढाई आहे, असे म्हटले आहे.
मी आयुष्यात पहिल्यांदाच न्यायालयाची पायरी चढली आहे. मी कोर्टबाजीसाठी राजकारणात नाही आले. मी राजकारणात सर्वसामान्य माय-बाप जनतेची सेवा आणि चांगले धोरण आखण्यासाठी आले होते. मला वाटले नव्हते हा दिवस येईल. शेवटी ही सत्याची लढाई आहे. सत्यासाठी जे काही करावं लागेल ते करेन.
कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचे असंख्य कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्रात पवारांनी अनेक वर्ष केलेले काम आणि मायबाप जनतेचे प्रेम आणि आशीर्वादामुळे आम्ही उभे आहोत. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही उभे आहोत, असेही सुळे म्हणाल्या.