Published On : Sat, Sep 7th, 2019

रनाळाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही पालकमंत्र्यांची गावकर्‍यांना ग्वाही

Advertisement

नागपूर: रनाळा या गावाला माझ्या राजकीय कारकीर्दीत खूप महत्त्व आहे. या गावातील गावकर्‍यांचे मला बहुमोल सहकार्य मिळाले. या गावाच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना दिली.

रनाळा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी कामठी पंचायत समितीच्या उपसभापती विमल साबळे, प्रख्यात उद्योगपती अजय अग्रवाल, कामठी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख अनिल निधान, उपविभागीय अधिकारी, खंडविकास अधिकारी, तहसिलदार, पंचायत समिती सभापती अनिता चिकटे, उपसभापती देवेंद्र गवते, श्री श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, सरपंच सुवर्णा साबळे, उपसरपंच आरती कुळकर्णी, येरखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच मंगला कारेमोरे, नागोराव साबळे, शहर भाजपा अध्यक्ष विवेक मंगतानी, पंकज सांबारे, मोहन माकडे, अरुण पोटभरे, रवी पारधी, मोरेश्वर कापसे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- रनाळा गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे. ज्या नागरिकांकडे पक्के घरे नाही, त्यांनी पंतप्रधान आवास योजनेत अर्ज करून लाभ घ्यावा. कामठी रनाळा मार्गावर पथदिवे लावण्यात येतील. सोबत सिमेंट रोड व नाल्यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार. जानेवारी महिन्यात येरखेडा रनाळा नगरपंचायत होणार असून नगर पंचायतच्या माध्यमातून येरखेडा रनाळा गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचेही पालकमंत्री याप्रसंगी म्हणाले.

रनाळा येथे 24 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, सिमेंट रोड, सिमेंट नाली, स्मशानभूमी बांधकाम आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पंकज साबळे यांनी तर आभार आरती कुळकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.