Published On : Mon, Mar 2nd, 2020

मनपामध्ये २२०६ ऐवजदार सफाई कर्मचारी होणार स्थायी

Advertisement

शहराला क्रमांक १ चे शहर बनविण्यासाठी कार्य करा : महापौर संदीप जोशी

पहिल्या टप्प्यात ३४७ कर्मचा-यांना स्थायी नियुक्ती आदेशाचे वितरण

नागपूर : आपले नागपूर शहर स्वच्छ, सुंदर दिसते ते केवळ सफाई कर्मचा-यांच्या कार्यामुळे. शहर स्वच्छ करण्यामध्ये ऐवजदार सफाई कर्मचा-यांचे मोठे योगदान आहे. या ऐवजदारांना मनपामध्ये स्थायी करून त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. शहराच्या आरोग्यासाठी कार्य करणा-या ऐवजदारांच्या प्रश्नांसाठी सभागृहातही सर्वपक्षीय नगरसेवक झटत आले.

या सर्व कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने अखेर ऐवजदारांना न्याय मिळाला. २२०६ ऐवजदार सफाई कर्मचा-यांना स्थायी नियुक्तीचे आदेशाचा मार्ग मोकळा झाला व २ मार्चला मनपाच्या स्थापना दिनी शहराच्या स्वच्छतेसाठी झटणा-या ऐवजदारांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करून मनपाचाच ख-या अर्थाने सन्मान होत आहे. या सन्मानासह जबबादारी वाढली असून आपले शहर देशात क्रमांक १ चे स्वच्छ व सुंदर शहर व्हावे यासाठी कार्य करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

सोमवारी (ता.२) ऐवदार सफाई कर्मचा-यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर संदीप जोशी होते. मंचावर उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सतीश होले, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, प्रतोद दिव्या धुरडे, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, नगरसेवक सुनील हिरणवार, लखन येरवार, नगरसेविका लीला हाथीबेड, आशा उईके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, राजेश हाथीबेड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, ऐवजदार सफाई कर्मचा-यांच्या अनेक समस्या आहेत. आरोग्याच्या समस्येमुळे अनेक ऐवजदारांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती मिळावी यासाठी तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले व ते लागू झाले. त्यानंतर नियमीत सफाई कर्मचा-यांच्या भरतीचा निर्णयही त्यांनी महापौर पदावर असताना घेतला. राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक अडथळे दूर करून ऐवजदारांना स्थायी नियुक्तीचा मार्ग मोकळा करून दिला, असेही ते म्हणाले. याशिवाय तीन लोकांनी सफाई कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. २०१७साली ऐवजदार नियमीत करण्याबाबत पहिल्यांदा राज्य शासनाला अहवाल पाठविण्याची तत्परता तत्कालीन आयुक्त अश्वीन मुद्गल यांनी दाखविली. पुढे ऐवजदारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना नोकरी मिळावी यासंदर्भातील प्रस्ताव तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी पारित केला. आज सभागृहात दिलेल्या निर्देशाचे पालन करून विषयाचा सखोल अभ्यास करून विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर करुन कार्यान्वीत केला, या सर्वांचे महापौरांनी अभिनंदन केले.

ज्या ऐवजदारांची २० वर्षाची सेवा पूर्ण झाली आहे त्यांना स्थायी नियुक्ती प्रदान केली जात आहे. यापुढे ज्या ज्या ऐवजदारांची २० वर्षाची सेवा पूर्ण होईल, त्यांना पुढे स्थायी नियुक्ती प्रदान केली जाईल, असेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

महानगरपालिकेमध्ये कार्यरत २२०६ ऐवजदार सफाई कर्मचा-यांना स्थायी केले जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ३४७ कर्मचा-यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येतील. सोमवारी (ता.२) समारंभात प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक झोनमधून ५ अशा एकूण ५० ऐवजदार सफाई कर्मचा-यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

ऐतिहासीक निर्णय : संदीप जाधव
नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासातील ऐतिहासीक क्षण आहे. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत ऐवजदारांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान केले जाणार आहे. हे क्षण मनपाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहीले जातील. सर्व सफाई कर्मचा-यांच्या चेह-यावरील आनंदाचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. याशिवाय सभागृहातही सर्वांनी सहकार्याची भूमिका दाखविली. मनपाच्या स्थापना दिनी सफाई कर्मचा-यांचा सन्मान व्हावा, यासाठी महापौर संदीप जोशी यांनीही विशेष पुढाकार घेतला, असे मत सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी व्यक्त केले.

सर्वांच्या प्रयत्नाला यश : तानाजी वनवे
ऐवजदार सफाई कर्मचा-यांना स्थायी करण्याबाबत सभागृहात अनेकदा चर्चा झाली. या चर्चेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी नेहमीच समर्थन केले. शहराच्या आरोग्याची धुरा सांभाळणा-या सफाई कर्मचा-यांसाठी झटलेल्या सर्वांच्या प्रयत्नाला ख-या अर्थाने यश मिळाले आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केले.

शहर स्वच्छतेची घडी सुधाराच्या दृष्टीने चालावी : दयाशंकर तिवारी
सफाई कर्मचा-यांच्या हिताच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी महापौर असताना पासूनच महत्वाचे निर्णय घेतले आहेत. विरोधी पक्षात असताना हिवाळी अधिवेशनात दिवंगत गोपीनाथ मुंढे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या सफाई कामगारांच्या मोर्च्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ऐवजदार सफाई कर्मचा-यांना स्थायी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी त्या आश्वासनाची पूर्तता केली. मनपाच्या स्थापना दिनाच्या दिवशी होत असलेला सन्मान जबाबदारी वाढविणारा आहे. आपल्या शहराच्या स्वच्छतेची घडी सुधारणेच्या दृष्टीने चालावी, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कार्य करावे, असे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी म्हणाले.

सफाई कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर : सतीश होले
लहानपणापासून सफाई कर्मचा-यांचे जीवन पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या, अडचणी जवळून पाहिल्या आहेत. सफाई कर्मचा-यांच्या समस्यांसाठी सभागृहामध्ये वेळोवेळी विषय मांडला. पुढे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने या लढ्याला यश मिळाले. पुढेही सफाई कर्मचा-यांच्या प्रश्नांसाठी लढत राहू. सफाई कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आहे, असे मत ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले यांनी मांडले.