
नागपुरात आयोजित आंदोलनादरम्यान बोलताना दिपके म्हणाले की, ६ जून रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन करून सरकारला अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने आता दिल्लीत निर्णायक लढा उभारला जाणार आहे. पेपरफुटीच्या घटनांमध्ये जबाबदारी निश्चित होत नसल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.
मोदी सरकारच्या कार्यकाळात वारंवार पेपरफुटी झाल्याचा दावा करत दिपके म्हणाले, “सरकारने पेपर लीक न झालेल्या चार परीक्षा दाखवाव्यात.” विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावरही टीका केली.
माझ्यावरचा हल्ला बेरोजगारीतून निर्माण झालेल्या संतापाचा परिणाम-
काल झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना दिपके यांनी हा प्रकार बेरोजगारीच्या समस्येतून निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम असल्याचे म्हटले. “हल्लेखोराकडे चांगली नोकरी असती तर कदाचित असा प्रकार घडला नसता,” असे ते म्हणाले. तसेच आजवर सत्तेत आलेल्या सर्वच पक्षांवर त्यांनी टीका केली, मात्र सध्या सत्तेत असलेल्यांनाच प्रश्न विचारणार असल्याचे स्पष्ट केले.
प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्ष काढावा लागतो, ही शोकांतिका-
राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबतच्या प्रश्नावर दिपके म्हणाले की, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करावा लागतो, ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी बाब आहे. हिंदू-मुस्लिम वादाच्या राजकारणातून युवकांना काहीही मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी युवकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
आंदोलन ‘हायजॅक’ केल्याच्या आरोपांचे खंडन-
आंदोलनावर काही संघटनांचा प्रभाव असल्याच्या आरोपांना उत्तर देताना दिपके यांनी हे आंदोलन युवकांच्या प्रश्नांसाठी असल्याचे सांगितले. “ज्यांना युवकांच्या प्रश्नांची चिंता आहे, त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले. सोशल मीडियावर स्वतःला विशिष्ट संघटनांशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
वायुसेना विमान प्रकरणावरूनही सरकारवर टीका-
पेपरफुटी रोखण्यासाठी वायुसेनेचे विमान वापरण्याच्या निर्णयावर टीका करत दिपके म्हणाले की, अशा उपायांनी समस्या सुटणार असती तर मागील अनेक वर्षांत पेपरफुटी थांबली असती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपला विश्वास असल्याचे सांगत दिपके म्हणाले, “माझ्यावर कोणी हात उचलला तरी मी प्रतिहल्ला करणार नाही. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असेल.” तसेच युवकांनी आणि नागरिकांनी या आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.




