नागपूर : संपूर्ण नागपूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. काही दिवसांपासून ओसीडब्ल्यू चे मीटर रीडर्स कर्मचारी मोठ्या संख्येत गैरहजर असल्यामुळे नागरिकांच्या बिलाबाबत प्रश्न निर्माण झाले होते. मात्र मनपा व ओसीडब्ल्यू ग्राहकांना योग्य वेळेत योग्य बिल प्रदान करून त्यांच्याकरिता सुविधा प्रदान करण्यास तत्पर असून कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरी नंतरही कामात कोणतेही व्यत्यय राहणार नसल्याची माहिती मनपा व ओसीडब्ल्यू द्वारे देण्यात आलेली आहे. यासोबतच त्यांनी नागरिकांच्या घरी पाणी मीटर चे रिडिंग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे देखील आवाहन केले आहे.
ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) च्या मीटर रीडर्स ने काही अवास्तव्य मागण्यांमुळे सामूहिक रजा घेतल्याने सदर परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक सेवा आणि ग्राहकांच्या सोयीसाठी, ओसीडब्ल्यूच्या इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सुविधेसाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. यात ग्राहक सेवा अधिकारी, टीम लीड्स, सर्व्हिस पॉईंट मॅनेजर्स आणि इतर सर्व सहाय्यक कर्मचारी मैदानावर उतरून घरोघरी जाऊन मीटर रीडिंग आणि बिल वितरणाचे काम करत आहेत.
सध्या नेहरू नगर, लकडगंज, आशी नगर, मंगळवारी या झोनमध्ये मीटर रिडिंग ची कामे सुरू आहेत. तर गांधीबाग आणि सतरंजीपुरा या झोनमध्ये बिल वाटपाची कामे केली जात आहेत. विपरीत परिस्थितीमध्ये देखील ग्राहकांना अखंड आणि पारदर्शक सेवा देण्याची कटिबद्धता यामधून ओसिडब्ल्यू ने दर्शविली आहे.
नागपूर शहरातील नागरिकांनी या तात्पुरत्या व्यवस्थेदरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन ओसीडब्ल्यू ने केले आहे.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.